छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना पुन्हा मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादी नेता आणि केंद्रीय समिती (सीसी) सदस्य नरसिंहचलम उर्फ गौतम उर्फ सुधाकर चकमकीत ठार झाला आहे. तो छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात मोस्ट वॉन्टेड होता. नक्षली सुधाकरवर तिन्ही राज्यांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. यापूर्वी, नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस बसवा राजू नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद येथे मारला गेला होता. छत्तीसगडमध्ये त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी नक्षली सुधाकर चकमकीत मारला गेल्याची पुष्टी केली आहे.
चकमकीत मारला गेलेला सुधाकर नक्षलवाद्यांच्या शिक्षण विभागाचा प्रमुख होता. तो आंध्र प्रदेशातील चिंतापलुडी गावचा रहिवासी होता आणि गेल्या तीन दशकांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षली सुधाकर, तेलंगणा राज्य समिती सदस्य बंदी प्रकाश, दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समिती सदस्य पप्पा राव आणि इतर काही सशस्त्र माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती.
हे ही वाचा :
संपलेला पक्ष अन आता एकत्र येण्याची भाषा, आरारा… काय वाईट दिवस!
अडीच लाख लोक आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी फक्त १ हजार पोलिस
प्री-डायबेटीसचा धोका कसा दर्शवला जातो!
माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमे दरम्यान इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला. या चकमकीत नक्षली सुधाकरला ठार करण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चकमकीनंतर गडचिरोली सिरोंचा आणि अहेरी भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सुधाकरसारखा मोठा नक्षल नेता ठार झाल्याने संघटनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.







