पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर काँग्रेससह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संसदेत या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील खासदारांना ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर राजधानीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, विद्यार्थी आंदोलन, पोलिस कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
हे ही वाचा:
वंचितकडून २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!
मध्य प्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह आंदोलनस्थळी पोहोचले आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. सरकारने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, परंतु धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि संसदेत चर्चेची हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा काँग्रेसने निर्धार व्यक्त केला.
सोमवारी संसद मार्चदरम्यान झालेल्या गोंधळानंतर विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेनंतर शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काँग्रेसने थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन छेडले आहे.







