सोमवारी पहाटे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ४.० तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याने दिल्लीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. दक्षिण दिल्लीतील धौला कुआन येथील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ भूकंपाचे केंद्र होते, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
सकाळी ५.३६ वाजता भूकंप पाच किलोमीटर खोलीवर जाणवला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विट केले. अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली-एनसीआरला भूकंपाचा धक्का बसला तेव्हा मोठा आवाज ऐकू आला. भूकंपाच्या वेळी ऐकू येणारा कर्कश आवाज हा भूकंपाच्या उथळ खोलीचा परिणाम असू शकतो. हे टेक्टोनिक प्लेट्समधील हालचाली आणि उर्जेच्या अनेक स्फोटांमुळे होऊ शकते.
हेही वाचा..
हातामध्ये आणि पायात बेड्या, अमेरिकेतून आलेल्या भारतीय निर्वासिताने सांगितली कहाणी!
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !
‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!
कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?
भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. भूकंपाच्या वेळी घराबाहेर उभे असलेले लोक आणि पंखे थरथरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे सध्या तरी वृत्त नाही. दिल्ली पोलीस आणि दिल्ली अग्निशमन सेवेला भूकंपाच्या वेळी कोणत्याही अनुचित घटनांबद्दल कॉल आले नाहीत.
जवळच तलाव असलेल्या धौला कुआन भागात दर दोन ते तीन वर्षांनी एकदा कमी तीव्रतेचे भूकंप होत आहेत. २०१५ मध्ये ३.३ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे आणि भूकंपाच्या संभाव्य धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अनेक राजकीय नेत्यांनी भूकंपाचे धक्के अनुभवल्याचा उल्लेख केला आणि प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी अशा पोस्ट केल्या आहेत. दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी भूकंपानंतर सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. देवाला प्रार्थना करते की सर्वजण सुरक्षित आहेत, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. आतिशी यांची पोस्ट अरविंद केजरीवाल यांनी शेअर केली आहे. दिल्ली पोलिसांनी एक्सवरून सांगितले की, आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित आहात. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.