पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, १८ जानेवारी रोजी स्वामित्व योजनेंतर्गत (SVAMITVA) १० राज्ये आणी दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मालमत्ता मालकांना मालमत्ता कार्ड (प्रॉपर्टी कार्ड) वितरीत केले आहेत. नरेंद्र मोदींनी सुमारे ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. यामध्ये २३० हून अधिक जिल्ह्यांमधील ५० हजारहून अधिक गावांतील मालकांना याचा लाभ मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनीही अहमदाबादमधील पीएम स्वमित्व योजना कार्यक्रमाला हजेरी लावली.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “आजचा दिवस देशातील गावांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक आहे. ६५ लाख मालमत्ता कार्डचे वाटप झाल्यानंतर गावातील सुमारे २.२४ कोटी लोकांकडे हे कार्ड असतील. खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना त्यांचे कायदेशीर पुरावे देता यावेत म्हणून या योजनेची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षात जवळपास १.५ कोटी लोकांना ही मालमत्ता कार्डे देण्यात आली आहेत.”
हे ही वाचा..
विदेशातील पुरोगाम्यांना महाकुंभाचा मुरडा!
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी, अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
टोकियोत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
बुलढाणा केस गळती प्रकरण : आयसीएमआर, एम्सने नमुने गोळा केले
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “२१ व्या शतकात जगात हवामान बदल, पाण्याचा अभाव, आरोग्य, महामारी यांसारखी अनेक आव्हाने आहेत. पण, जगासमोर आणखी एक मोठे आव्हान आहे आणि ते म्हणजे मालमत्ता अधिकार. अनेक वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील अनेक देशांमध्ये रिअल इस्टेटबाबत अभ्यास केला होता. या अभ्यासातून समोर आले होते की जगातील अनेक देशांमधील लोकांकडे त्यांच्या मालमत्तेची ठोस कायदेशीर कागदपत्रे नाहीत. यापूर्वीच्या सरकारांनी या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे २०१४ मध्ये आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा या आव्हानाला तोंड देण्याचे ठरवले आणि आम्ही ही योजना सुरू केली. ठरवले की, ड्रोनच्या मदतीने देशातील प्रत्येक गावात घरांच्या जमिनींचे मॅपिंग केले जाईल आणि गावातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेची कागदपत्रे दिली जातील.”