कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. यानंतर सोमवारी (२० जानेवारी) संजय रॉय याला काय शिक्षा मिळणार, याची घोषणा केली जाणार आहे.
गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या संघटनांनी देशभरात मोर्चे काढले होते. तसेच कोलकाता येथे डॉक्टरांचे उपोषण आणि बंद बराच काळ सुरू होता. या प्रकरणात कोलकाता पोलिसांचे अपयश आणि डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.
सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहीजे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६४, ६६ आणि १०३ (१) अंतर्गत संजय रॉय याला बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. निकालानंतर पीडितेच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झाले होते. या खटल्यात दोषी ठरलेल्या संजय रॉय याने मात्र आपल्याला खोटेपणाने गोवण्यात येत आहे, असे म्हटले.
हे ही वाचा..
स्वामित्व योजनेंतर्गत ५० हजारांहून अधिक गावांमध्ये ६५ लाख मालमत्ता कार्ड्सचे वितरण
विदेशातील पुरोगाम्यांना महाकुंभाचा मुरडा!
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी, अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
टोकियोत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणारी एक महिला डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री तिची शिफ्ट संपल्यानंतर सेमिनार हॉलमध्ये गेली होती. त्यानंतर ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते की, संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटेच्या सुमारास बाहेर आला.