मुंबई गुन्हे शाखेसह पोलिसांचे ३५ पथके सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. हल्ल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती अद्याप लागत नसल्यामुळे मुंबई पोलिसांचे हे मोठे अपयश मानले जात आहे.
या गुन्ह्याच्या तपासात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांचे पथक देखील या हल्लेखोरा पर्यत पोहचू शकलेले नाही. या हल्लेखोराने मुंबई पोलिसांची झोप उडवली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या हाती हल्लेखोराचे सीसीटीव्ही फुटेज लागून देखील पोलीस त्याच्यापर्यत पोहचू शकत नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी आपले जुने खबऱ्यांना सक्रिय केले आहे.
पोलिसांच्या हाती लागलेल्या फुटेज पैकी पहिले अभिनेता सैफ अली खानच्या अपार्टमेंट मधील आपत्कालीन जिना उतरताना,दुसरे फुटेज वांद्रे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या लकी रेस्टॉरंट जवळील आणि तिसरे फुटेज दादरच्या कबुतरखाना जवळ असणाऱ्या एका मोबाईल एक्सेसीरिजच्या दुकानात शुक्रवारी मिळून आले आहे.या तिन्ही फुटेज मध्ये हल्लेखोराने हल्लाच्या वेळचे कपडे बदलून दुसरे कपडे परिधान केल्याचे आढळून आले आहे.
सैफ अली खान यांच्या सदगुरु शरण या इमारतीत गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने प्रवेश करून सैफ अली आणि त्याचे कुटुंब राहत असलेल्या १२ मजला गाठून एक कोटींची मागणी करत थेट सैफ अली खान आणि त्यांच्याकडे कामाला असणारी स्टाफ नर्स यांच्यावर चाकू हल्ला करून आपत्कालीन जिन्याने १२ मजले उतरून फरार झाला.
या चाकू हल्ल्यात सैफ अली खान गंभीरपणे जखमी झाला होता. त्याला तात्काळ लिलावती रुग्णालयात आणण्यात आले, रुग्णालयात सैफ वर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. या हल्ल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक लिलावती रुग्णालयात तर दुसरे पथक सैफ यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आले होते.
पळून गेलेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्याचे जवळपास ३५ पथके तयार करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर याच्याकडे मोबाईल फोन नव्हता किंवा मोबाईल असला तरी तो बंद अवस्थेत असल्यामुळे त्याचे टॉवर लोकेशन शोधता येत नाही.
सैफ वरील हल्ल्याला ४८ तास उलटूनही मुंबई पोलिसांच्या तपास पथकाच्या हाती हल्लेखोर लागलेला नाही,एरव्ही अगदी किचकट गुन्ह्याचा काही तासांमध्ये बिमोड करणाऱ्या मुंबई पोलीस या हल्लेखोरापर्यत अद्याप का पोहचू शकत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वांद्रे पोलीस ठाण्याच्या एका पथकाने हल्लेखोरा सारखा हुबेहूब दिसणाऱ्या एका व्यक्तीला दक्षिण मुंबईतील चर्निरोड येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे ४ तास तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले, दरम्यान पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या २० ते २५ गुन्हेगारांची आतापर्यत चौकशी करण्यात आली आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांची देखील चौकशी करण्यात आली परंतु पोलिसांच्या हाती हल्लेखोराची कुठलीही माहिती लागू शकलेली नाही.
एका दुकानात हेडफोन खरेदी करताना अभिनेता सैफ अली खानला चाकूहल्ला करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हे ही वाचा:
विदेशातील पुरोगाम्यांना महाकुंभाचा मुरडा!
स्वामित्व योजनेंतर्गत ५० हजारांहून अधिक गावांमध्ये ६५ लाख मालमत्ता कार्ड्सचे वितरण
बुलढाणा केस गळती प्रकरण : आयसीएमआर, एम्सने नमुने गोळा केले
आरजी कार मेडिकल कॉलेज प्रकरणाचा आज निकाल
दादरमधील कबूतरखान्या जवळ ‘इकरा’ नावाचे दुकान आहे. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हा या दुकानात गेला होता, तेथून त्याने एक हेडफोन विकत घेतला होता. मोबाईल शॉपमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हल्लेखोर कैद झाला आहे,या फुटेज वरून तपास पथक हल्लेखोराचा कसून शोध घेण्यात येत आहे.
शुक्रवारी अभिनेत्री आणि सैफची पत्नी करीना कपूर खानने वांद्रे पोलिसांकडे तिचा जबाब नोंदवला आहे, पोलिसांनी चाकू हल्ल्याच्या घटनेसंदर्भात ३० हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.