केंद्र सरकारचे २०२६ पर्यंतचे नक्षलवाद नायनाट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सुरक्षा दल काम करत आहेत. मागील काही महिन्यात सुरक्षा दलाने अनेक नक्षलवाद्यांना ठार केले आहे. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच अनेक महिला-पुरुष नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे. अशातच गडचिरोलीमधून एक बातमी समोर आली आहे. भामरागड तालुक्यापासून १२ किमी अंतरावर असलेल्या कियेर या गावातील माजी सभापतींची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ही घटना शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती असलेले सुकराम महागु मडावी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. मौजा कियेर येथील रहिवासी असलेले सुखराम मडावी यांना घरातून उचलून नेत गावाला लगत असलेल्या मैदानावर गळा दाबून त्यांची हत्या केली.
मृतदेहाजवळ एक पत्रक टाकून नक्षलवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी असल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती. ते पोलिसांना माहिती पुरवण्याचे काम करत असल्याचे पत्रकारामध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा :
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
युवराज म्हणतात, केवळ २०-२५ लोकांच्या फायद्याचा अर्थसंकल्प
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा
दरम्यान, या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची दखल घेत ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर महिनाभरात कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.