काही चित्रपट असे असतात की, जे प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतात. पारंपरिक शिकवणुकीच्या मळलेल्या वाटा सोडून, ते सत्याचा नव्या दृष्टीकोनातून शोध घेतात. डोळ्यांवरील झापडं दूर करून वास्तवाकडे निर्भीडपणे पाहायला शिकवतात. सखोल अभ्यास, तपश्चर्या आणि वैचारिक प्रामाणिकपणातून तयार झालेले असे चित्रपट केवळ पाहिले जात नाहीत तर ते अनुभवले जातात, अंगीकारले जातात. ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ हा चित्रपट ह्याच पठडीतला आहे. लेखक-दिग्दर्शक मनप्रीतसिंग धामी यांच्या चिंतनशील दृष्टिकोनातून साकारलेला.
सामान्य प्रेमकथा किंवा ऍक्शनपटांच्या बाजारू चौकटीला दूर सारत, चार वर्षांच्या संशोधनातून आणि सत्तर-ऐंशी नावाजलेल्या अभिनेत्यांकडून नकार झेलत, अखेरीस सुबोध भावेंपर्यंत ही कल्पना पोहोचते आणि या चित्रपटाची निर्मिती होते. अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले सुबोध भावे यांनी चित्रपटातील प्रसिद्ध युट्यूबर नीरज अत्री यांच्या भूमिकेला समर्पक न्याय दिला आहे.
आजच्या तरुणाईमध्ये देशप्रेम म्हणजे ऐतिहासिक किंवा स्वातंत्र्यलढ्यातील कथा असलेले चित्रपट पाहणे, अशी पोकळ समज असताना — एका विज्ञान विषयाच्या, तथाकथित उदारमतवादी विचारसरणीच्या प्राध्यापकाच्या सत्यशोधाचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. ही कथा म्हणजे सत्यासाठी लढणाऱ्या मनाच्या सत्वपरीक्षेची आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनासमोर मात्र अनेक अडथळे उभे राहिले आहेत. वितरकांकडून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनच न होऊ देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रेक्षकांची वर्दळ कमी असलेल्या चित्रपटगृहांमध्ये, अडनिड्या वेळांमध्ये प्रदर्शन आयोजित करून चित्रपटाला मर्यादित ठेवण्याचा पवित्रा घेतला जात आहे. चेंबूरसारख्या ठिकाणी तर विचित्र प्रकार घडतोय — ऑनलाइन तिकिट बुक करणाऱ्या प्रेक्षकाला ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ चित्रपटाचे तिकीट बुक केल्यानंतर प्रत्यक्षात ‘Final Destination’ नावाचा चित्रपट दाखवला जातो.
वडोदऱ्यात तर प्रदर्शनाचे वेळापत्रक अचानक रद्द करून “वरिष्ठ अधिकारी सध्या उपलब्ध नाहीत” अशी कारणे देण्यात आली. अनेक ठिकाणी पूर्वनियोजित आणि फुल्ल बुकिंग झालेली सत्रं अचानक रद्द करून, त्या जागी दुसरे चित्रपट लावले गेले आहेत. आणि तरीही चित्रपटगृहं रिकामी दिसत असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे.
या चित्रपटाला थांबवण्यामागे कोणते हेतू आहेत? हे केवळ अपघाती घडतंय की कोणीतरी ठरवून करतंय? अशा प्रश्नांनी सोशल मीडियावर पाहिलेल्या प्रेक्षकांची मने ढवळून निघाली आहेत. ठाणे, पुणे यांसारख्या संस्कृतीचा गड मानल्या जाणाऱ्या शहरांतही धामी यांना खूप मेहनत करून प्रदर्शनाची संधी मिळवावी लागली. नाशिकमध्ये मिळालेला एकमेव शोदेखील अचानक हटवण्यात आला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला, ते भारावलेल्या भावनेने भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
पण जर ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ सारख्या कलाकृतीचेच चित्रपटगृहात स्वागत केले जात नसेल, तर भारतीय प्रेक्षकांना ऐतिहासिक सत्य पाहण्याचा आणि विचार करण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो आहे. म्हणूनच, लोकांनीच चित्रपटगृहांवर दबाव आणून या चित्रपटाचे स्वातंत्र्य आणि सन्मान राखणे, ही काळाची गरज आहे.
हे ही वाचा:
भगवान बिरसा मुंडा यांना झारखंडमध्ये अभिवादन
प्रेमप्रकरणातून राजा रघुवंशीची झाली हत्या…
मोदींच्या ११ वर्षांच्या काळाची नोंद सुवर्णाक्षरात व्हायला हवी
इतिहासाच्या पडद्यामागचं सत्य
चित्रपटाची मूळ कथा अशी उलगडते. एक गणिताचा प्राध्यापक, आपल्या मुलीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही वाचताना विचारमग्न होतो. त्यातून सुरू होतो एक सत्याचा शोध. त्याचा हा शोध केवळ वैयक्तिक राहत नाही. तर प्रेक्षकांनाही अनेक दडवलेली, विकृत केलेली ऐतिहासिक सत्यं समोर येऊ लागतात. आपण लहानपणापासून शिकत आलो त्या इतिहासातील सत्यता तपासण्याची प्रेरणा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रोवतो.
चित्रपटाचा पोत ढळू न देता, दाखवलेल्या घटनांची सत्यता विश्वसनीय स्रोतांद्वारे तपशीलवार उलगडून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे दिसून येतो. विशेषतः भारतीय इतिहासाच्या रचनेत मार्क्सवादी इतिहासकारांनी खेळलेली भुमिका आणि त्यांच्या वैचारिक अजेंड्याचे पडसाद कसे शिक्षणपद्धतीत उमटले आहेत, याचा स्पष्ट भेदक वेध हा चित्रपट घेतो.
रोमिला थापर, इरफान हबीब यांसारख्या स्वतःला खुलेआम मार्क्सवादी म्हणवणाऱ्या इतिहासकारांनी, त्यांच्या वैचारिक भूमिकांना बळ देण्यासाठी इतिहासाचा कसा वापर केला, याचे सुबक आणि ठोस चित्रण येथे आढळते. इतिहासाच्या नावे सत्य लपवून, विकृत स्वरूप देण्याचे आणि हिंदू परंपरांना हेतुपुरस्सर बदनाम करण्याचे त्यांच्या लिखाणातून जे प्रयत्न झाले, त्यांचा हा चित्रपट प्रभावीपणे पर्दाफाश करतो. सत्याचा शोध जगभरात मार्क्सवादी तत्त्वज्ञानामुळे कोट्यवधी बळी गेले असतानाही, भारतीय शिक्षणपद्धतीत या रक्तरंजित इतिहासाचा उल्लेखही न होणे, ही चिंतेची बाब आहे. अनेक दशके JNU आणि AMU सारख्या संस्थांतील विशिष्ट विचारधारेच्या मंडळींनी पाठ्यपुस्तकांचे लेखन हाती घेतले आणि यामार्फत एकाच बाजूचा, तथ्यविरहित, दडपलेला इतिहास भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी प्रादेशिक संचालक के. के. मोहम्मद यांनी स्वतःच्या संशोधनातून या विकृतींचा भांडाफोड केला आहे. ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ हा चित्रपट त्याच मार्गावर चालत, दाखवलेल्या दृश्यांमधून आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सत्याच्या विकृतीकरणावर झगझगीत प्रकाश टाकतो.
या चित्रपटात विशेषत्वाने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी हिंदू परंपरांविषयी पसरवलेल्या खोट्या, अंधकारमय गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्लामी आक्रमणकर्त्यांच्या क्रौर्याचे दृश्यदर्शन ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, ते शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या इतिहासाच्या वेदना उजेडात आणते.
ब्रिटिशांच्या “फोडा आणि राज्य करा” धोरणाचा परिणाम आजही भारतीय समाजात कसा जाणवतो, हे चित्रपट प्रभावीपणे दाखवतो. शिवाय, वर्णव्यवस्थेच्या मूळ स्वरूपाची — जी जन्माधारित नसून कर्म आणि गुणांवर आधारित होती — यथार्थ मांडणी करण्यात आली आहे. सामाजिक व्यवहार, विवाह, वारसा या गोष्टी कशा मानवतावादी विचारांनी चालवल्या जात होत्या, हे सुबोध भावे यांच्या प्रभावी अभिनयातून प्रकर्षाने जाणवते.
ब्रिटिश अधिकार्यांच्या दस्तऐवजीकरणामुळे हे मुद्दे आज विश्वासार्हतेने मांडता येतात, याकडे चित्रपट सुबोधतेने लक्ष वेधतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात, शैक्षणिक क्षेत्रात भारतविरोधी कथानकांना पोसणारी आणि डाव्या विचारसरणीला संरक्षण देणारी संपूर्ण व्यवस्था उलगडली जाते. परकीय निधी, पुरस्कार, परदेशी प्रवास, बड्या गटांतील उठबस या गोष्टींच्या मोबदल्यात शिक्षणसंस्थांमधून भारत द्वेषी अजेंडा पुढे रेटला जातो, याचे भेदक चित्रण इथे होते.
‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ हा केवळ एक चित्रपट नाही — तो आपल्याला आपल्या इतिहासाचे पुनर्परीक्षण करायला लावतो, आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या पुनर्बांधणीसाठी दिलेली एक साद आहे. या सादेला प्रतिसाद देणे ही प्रत्येक विचारशील भारतीयाची जबाबदारी आहे.
