एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने आज प्रथमच अधिकृतपणे दिली. १२ जून रोजी लंडनला जाणारे हे विमान कोसळल्यापासून एकूण मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. डीएनए चाचणीनंतरच हा आकडा निश्चित करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून २६० मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे, तर सहा मृतदेहांची चेहऱ्यावरून ओळख पटली आहे. मृतांमध्ये १२० पुरुष, १२४ महिला आणि १६ मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत २५६ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत, तर उर्वरित मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा :
‘ऍक्सिओम-४ मिशन’: शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकासाठी रवाना!
अभिनंदन वर्धमानला पकडणाऱ्या, पाक अधिकाऱ्याचा चकमकीत मृत्यू!
व्हिवा ग्रुपचे मालक मेहुल ठाकूर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!
भाजपा आज देशभरात ‘संविधान हत्या दिन’ साजरा करणार
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानातील ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे. ब्लॅक बॉक्स खराब झाल्याने तो डेटा काढण्यासाठी परदेशात पाठवला जाऊ शकतो, अशा माध्यमांतील वृत्तांबद्दल विचारले असता, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी याला केवळ एक अटकळ म्हटले. ब्लॅक बॉक्स भारतातच आहे आणि सध्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो त्याची तपासणी करत आहे असे ते म्हणाले. या अपघातानंतर एअर इंडियाने अनेक सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाइड-बॉडी विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
