देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन

दरवर्षी २४ लाख मेट्रिक टन पेट्रोकेमिकल उत्पादन करण्याची क्षमता

देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (४ जुलै) राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील पचपद्रा येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे देशाच्या इंधन उत्पादन क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राजस्थानच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (HRRL) या संयुक्त उपक्रमामार्फत उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुमारे ७९,४५९ कोटी रुपये खर्चून साकारण्यात आला आहे. या संयुक्त उपक्रमात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ची ७४ टक्के, तर राजस्थान सरकारची २६ टक्के भागीदारी आहे. या रिफायनरीचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते आणि आता ती व्यावसायिक उत्पादनासाठी सज्ज झाली आहे.

या अत्याधुनिक संकुलात दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टन (9 MMTPA) कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. याशिवाय दरवर्षी २४ लाख मेट्रिक टन पेट्रोकेमिकल उत्पादन करण्याचीही क्षमता या प्रकल्पात आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धित इंधन आणि पेट्रोकेमिकल उत्पादने तयार करता येणार आहेत.

या प्रकल्पातून बीएस-6 दर्जाचे पेट्रोल आणि डिझेल तसेच पॉलीप्रॉपिलीन, एचडीपीई (HDPE), एलएलडीपीई (LLDPE), बेंझीन, टोल्युइन आणि बुटाडायीन यांसारखी पेट्रोकेमिकल उत्पादने तयार केली जाणार आहेत. या उत्पादनांचा वापर पॅकेजिंग, औषधनिर्मिती, वाहन उद्योग, रंग आणि ग्राहक वस्तू उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.

बारमेर-बालोतरा परिसरातील मंगला तेलक्षेत्रातून मिळणाऱ्या कच्च्या तेलाचा वापर या रिफायनरीत केला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम राजस्थानमध्ये उद्योगांची साखळी विकसित होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

टेलिग्रामला पायरसीवर १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

फ्रान्समध्ये ‘जून’ ठरला ८० वर्षातील सर्वात उष्ण महिना

पावसाने जोर धरताच मुंबईच्या जलाशयांना दिलासा

पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवकावर रशियाचा ताबा

राजस्थान दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी केवळ या रिफायनरीचे उद्घाटनच केले नाही, तर राज्यातील सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणही केले. यामध्ये विमानतळ, रस्ते, रेल्वे, ऊर्जा, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही रिफायनरी देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यास, इंधन उत्पादन क्षमता वाढवण्यास आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात भारताला अधिक आत्मनिर्भर बनवण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच पश्चिम भारताला इंधन उत्पादन आणि वितरणाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याच्या दिशेनेही हा प्रकल्प निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version