१९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेवर सहज मात करत भारताने हा विजय मिळविला.
मलेशियात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ८२ धावांत उखडले आणि नंतर १ फलंदाज गमावून ११.२ षटकांत अर्थात ५२ चेंडू राखून भारताने ही लढत सहज जिंकली.
भारतातर्फे त्रिशा गोंगाडीने ३३ चेंडूंत ४४ धावांची सर्वोच्च खेळी केली. तिच्यासोबत सानिका चाळके (२६) नाबाद राहिली.
त्याआधी, भारताच्या त्रिशाने १५ धावांत ३ बळी घेत दक्षिण आफ्रिकेला दणके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत अवघ्या ८२ धावांतच गुंडाळला गेला. वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हे ही वाचा:
कुंभमेळा परिसरात चिकन बनवणाऱ्याला साधूंकडून चोप!
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा
परराष्ट्र मंत्र्यांना दिल्लीतल्या सुविधांची काळजी, म्हणाले-मला लाज वाटते!
दक्षिण आफ्रिकेतर्फे मिकी वॅन वूर्स्टने सर्वाधिक २३ धावा केल्या. बाकी फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेनेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नाणेफेकीनंतर घेतला होता, पण तो फसला. त्यांच्या केवळ चार फलंदाजांनी दोन अंकी धावसंख्या केली. तर चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
भारताने २०२३मध्ये पहिल्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळविले होते. इंग्लंडवर त्यावेळी ७ विकेट्सनी मात करत भारतीय मुलींनी विजेतेपदाला गवसणी घातली होती. यावेळी सलग दुसऱ्यांदा हा विजय भारताने मिळविला आहे.
स्कोअरबोर्ड
दक्षिण आफ्रिका सर्वबाद ८२ (मिकी वॅन वूर्स्ट २३, फे काउलिंग १५, कराबो मेसो १०, त्रिशा गोंगाडी ३-१५, वैष्णवी शर्मा २-२३, आयुषी शुक्ला २-९, परुणिका सिसोदिया २-६, शबनम शकील १-७) पराभूत वि. भारत ११.२ षटकांत १ बाद ८४ (त्रिशा गोंगाडी नाबाद ४४, सानिका चाळके नाबाद २६).







