एकदाचा तो क्षण आला… जेव्हा मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना दिला आनंदाचा स्फोट! सूर्यकुमार यादवच्या जादुई अर्धशतक आणि बुमराह-सॅंटनरच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि थेट आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला!
टॉस हरल्यानंतर मुंबईने फलंदाजी स्वीकारली. पहिल्याच चेंडूपासून सामना रंगत गेला. सलामीवीर रिकेल्टनने २५ धावा करत ठोस सुरुवात केली. रोहित शर्मा फक्त ५ धावांवर बाद झाला, पण मुंबईच्या चाहत्यांची चिंता फार काळ टिकली नाही…
कारण मैदानात उतरला सूर्या! सूर्यकुमार यादव!
तो एक वेगळाच सूर होता. त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक फटक्यात आत्मविश्वास होता. फक्त ४३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत सूर्यानं नाबाद ७३ धावा फटकावल्या. त्याला तिलक वर्माने (२७) आणि शेवटी नमन धीरने फक्त ८ चेंडूत झंझावाती २४ नाबाद धावा करत साथ दिली. एकूण २० षटकांत मुंबईने १८०/५ असा मजबूत डोंगर उभारला
दिल्लीसमोर १८१ धावांचं आव्हान होतं. पण सुरुवातीलाच मुंबईच्या वादळी गोलंदाजीने दिल्लीचा डाव अक्षरश: कोसळवला. के.एल. राहुल (११), फाफ डु प्लेसिस (६), अभिषेक पोरेल (६) हे तिघेही पॉवरप्लेमध्ये माघारी परतले. पुढे समीर रिजवी (३९) आणि विपराज निगम (२०) थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या ‘मिशन प्लेऑफ’पुढे ते अपुरे ठरले. अखेरीस दिल्लीची संपूर्ण टीम २० षटकांत १२१ धावांत ऑलआउट झाली.
मुंबईसाठी बुमराह आणि मिचेल सॅंटनरने ३-३ बळी घेतले. ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये मुकेश कुमारने २ बळी घेतले, तर चमीरा, मुस्ताफिजुर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी १ विकेट मिळाली. पण तोपर्यंत सूर्याचं झगमगणं पूर्ण वानखेड्याला प्रकाशमय करून गेलं होतं!
आता पुढील थांबा – प्लेऑफ!
🔥 ‘मुंबई इंडियन्स’ तयार आहे, आणि वाट बघतोय कोण पुढे येणार याची…
