29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरविशेष‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?

‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?

कायद्याचा नीट अभ्यास नसल्यामुळे होतो गोंधळ

Google News Follow

Related

एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बुलढाणा येथील वरील बातमी देण्यात आली आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात टळावेत, यासाठी तेथे स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय यंत्र लावल्याचा आणि महामृत्युंजय मंत्राचा सव्वा कोटी जप केल्याचा ‘प्रकार’ घडल्याचे बातमीत म्हटले आहे. हा ‘प्रकार’ समोर आल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी आक्षेप घेत ‘गुन्हे’ दाखल करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याची गंभीर दखल घेऊन आयोजक आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा “महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम 2003“ च्या तरतुदीनुसार दाखल केल्याचे म्हटले आहे.

 

 

कायदा कोणता ?

 

मुळात २००३ मधला असा कोणताही कायदाच नाही. जर “अधिनियम” म्हणायचा झाला, तर “Maharashtra Ordinance XIV of 2013”, हा अधिनियम “Maharashtra Act No. XXX of 2013” च्या कलम 13 नुसार रद्द (Repealed) केला गेला आहे. सामान्यतः जो जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो “Maharashtra Act No. XXX of 2013” हाच असून , २६ ऑगस्ट २०१३ पासून
लागू आहे.

 

 

काय आहेत तरतुदी ?

नरेंद्र दाभोळकर यांच्या अथक प्रयत्नातून आलेला, पण दुर्दैवाने त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आलेला हा कायदा अत्यंत काळजीपूर्वक बनवण्यात आला आहे. ‘श्रद्धा’, विशेषतः ‘धार्मिक श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ या दोहोंत गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, याची पुरेपूर दक्षता या कायद्याच्या मसुद्यात घेण्यात आलेली आहे. डॉ. हमीद दाभोळकर यांनी या कायद्याचा पुरेसा अभ्यास केलेला नसावा, असे त्यांच्या वरील तक्रारीवरून म्हणावेसे वाटते. या कायद्याच्या कलम १२ मध्ये, श्रद्धा, धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील गोंधळ मुळीच राहू नये, यासाठी, अत्यंत स्पष्टपणे आठ अशा अपवादात्मक गोष्टी दिल्या आहेत, ज्या बाबतीत ह्या कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. (Nothing in this Act shall apply in respect of the following ……..)

हे ही वाचा:

आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

पुण्यातून संशयित दहशतवाद्याला उचलले; आयसीस मॉड्युल प्रकरणात पाचवी अटक

आयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

मुंबईला पावसाने झोडपले, चर्चगेट जलमय, उपनगरात दमदार

 

 

कायद्याला अपवाद असलेल्या गोष्टी –

 

या कलम १२ मधील क्र.(४) – उपासना, प्रार्थना, धार्मिक विधी, इ. क्र.(५) – नवस बोलणे, इ. व क्र. (७) – वास्तुशास्त्रीय सल्ले, इ. ही उपकलमे नीट वाचून पाहिल्यास बुलढाणा येथे स्वामी समर्थ परिवाराकडून करण्यात आलेले विधी ह्या कलमांतर्गत येत असल्याने त्याला मुळात या कायद्याच्या तरतुदी लागूच नसल्याचे स्पष्ट होईल. ही उपकलमे कुठलेही धार्मिक विधी, उपासना, प्रार्थना, नवस (उपकलम (५) मध्ये नवस शब्दाचा स्पष्ट उल्लेख आहे.), तसेच वास्तुशास्त्रीय सल्ले, यांना या कायद्याच्या तरतुदीपासून ‘अपवाद’ म्हणून वगळतात, ह्या गोष्टीना हा कायदा लागू होणार नाही, असे स्पष्ट करतात.

 

अंधश्रद्धा नेमक्या कोणत्या ?

 

कायद्यातील तरतुदी कोणत्या गोष्टींना लागू होणार नाहीत, ते कलम १२ – उपकलम (१) ते (८) मध्ये स्पष्ट केल्यावर, मग ह्या कायद्यानुसार ‘अंधश्रद्धा’ नेमके कुठल्या गोष्टींना म्हटले जाईल, ते स्पष्ट करण्यासाठी कलम २(१)(b) नुसार एक सूची (Schedule) या कायद्याला जोडण्यात आलेली आहे. त्या सूचित फक्त १२ गोष्टी आहेत.

 

डॉ. हमीद दाभोळकर यांना आम्ही नम्र विनंती करू इच्छितो, की त्यांनी ही सूची वाचून बघावी, आणि बुलढाणा येथे स्वामी समर्थ परिवाराकडून जे काही केले गेले, ते ह्यापैकी – एक ते बारा मधील – कुठल्या क्रमांकावर येते ते दाखवून द्यावे. कोणाही सरळ, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या माणसाच्या हे सहज लक्षात येईल, की स्वामी समर्थ परिवाराकडून करण्यात आलेली कोणतीही गोष्ट सदर सूचीतील गोष्टींपैकी नाही. सदर सूचीतील निषिद्ध, प्रतिबंधित गोष्टी सामान्यतः – आर्थिक फसवणूक, मानसिक ,लैंगिक छळ, मारहाण, नरबळी, चेटूक करीत असल्याच्या संशयावरून एखाद्याचा छळ, एखाद्याचा बहिष्कार, मूल नसलेल्या स्त्रियांना अपत्यप्राप्तीचे खोटे आश्वासन, सर्पदंश / श्वानदंश यांवर वैद्यकीय उपचारांऐवजी गंडेदोरे, इ. देणे – अशा स्वरूपाच्या आहेत. थोडक्यात स्वामी समर्थ परिवाराकडून बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या संदर्भात करण्यात आलेल्या गोष्टी, ह्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात दिलेल्या सूचीनुसार “अंधश्रद्धा” नसून, उलट त्या कायद्याच्या कलम १२ मधील अपवादात्मक गोष्टींमधील आहेत, ज्यांना त्या कायद्याच्या तरतुदी लागू नसल्याचे खुद्द कायद्यातच नमूद आहे.

 

 

डॉ. हमीद दाभोळकर यांनी त्यांच्या स्वतःच्या आदरणीय वडिलांच्या प्रयत्नातून तयार केला गेलेला कायदा नीट अभ्यासावा. पोलीस अधीक्षक कडासने यांनीही तथाकथित ‘गुन्हा’ दाखल करण्यापूर्वी कायदा नीट वाचलेला दिसत नाही. स्वामी समर्थ परिवाराने सदर कायद्यानुसार गुन्हा ठरेल, अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही.

श्रीकांत पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा