जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी बुधवारपासून या भागात दहशतवाद्यांना वेढा घातला आहे. गुरुवारी (३ जुलै) पुन्हा एकदा ही चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.
लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी संध्याकाळी किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागात शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ही चकमक सुरू झाली.
भारतीय लष्कराच्या नागरोटास्थित व्हाईटनाईट कॉर्प्सने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्टद्वारे सांगितले की, “विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, किश्तवाडच्या कांजल मांडूमध्ये संयुक्त शोध मोहीम राबविण्यात येत होती. या दरम्यान, दहशतवाद्यांबद्दल अचूक माहिती मिळाली आणि चकमक सुरू झाली.”
हे ही वाचा :
मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा ठप्प
युवकावर गोळ्यांचा मारा, कुटुंबावर शोककळा
राहुल गांधींना अमित मालवीय यांनी दाखवला आरसा
किश्तवाडमधील ही चकमक अशा वेळी घडली आहे जेव्हा अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था पहलगाम आणि बालताल येथील दोन बेस कॅम्पवर पोहोचला होता. गुरुवारी, दुसरी तुकडीही जम्मूतील भगवती नगर येथून पुढील मुक्कामासाठी रवाना झाली. २६ जून रोजी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागातही एक चकमक झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले.
