आघाडीची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (J&J) ने आपल्या टॅल्क-आधारित बेबी पावडरमुळे अंडाशयाचा (ओव्हेरियन) कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या हजारो महिलांनी दाखल केलेल्या खटल्यांवर तोडगा काढण्यासाठी ५.५ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ₹४७ हजार कोटी) पर्यंतची तडजोड करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. हा करार गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या सर्वात मोठ्या उत्पादन-दायित्व (Product Liability) प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या प्रस्तावित करारामध्ये सुमारे ७६ हजार दावे समाविष्ट आहेत. मात्र, हा करार लागू होण्यासाठी पात्र दावेदारांपैकी किमान ९५ टक्के जणांची संमती आवश्यक असेल. कंपनीने २०२७ पर्यंत सुमारे ३ अब्ज डॉलर अदा करण्याची तयारी दर्शवली असून, उर्वरित रक्कम त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिली जाईल.
जॉन्सन अँड जॉन्सनने मात्र पुन्हा एकदा आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या टॅल्क-आधारित उत्पादनांमध्ये ॲस्बेस्टॉस नव्हता आणि या उत्पादनांमुळे कर्करोग होतो, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अनेक वैज्ञानिक अभ्यास आणि नियामक संस्थांच्या निष्कर्षांमुळे आपल्या उत्पादनांची सुरक्षितता सिद्ध झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
गेल्या काही वर्षांत या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने दिवाळखोरीच्या कायद्याचा आधार घेत सामूहिक तडजोड करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, अमेरिकेतील न्यायालयांनी ते प्रयत्न फेटाळून लावले. त्यानंतर कंपनीने आता थेट दावेदारांशी करार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
हे ही वाचा:
हॉटेलातील पार्टीवरून वांगचुक यांनी कोक्रॉचना सुनावले
अल्पवयीन विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची तात्काळ सुटका करा
संपत्ती वाढली, पण सल्लागार कमी! भारतासमोर नवे आर्थिक आव्हान
भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प; शेकडो भाविक अडकले
जॉन्सन अँड जॉन्सनविरोधातील हे खटले दशकभरापासून सुरू आहेत. हजारो महिलांनी कंपनीच्या टॅल्क-आधारित बेबी पावडरमध्ये ॲस्बेस्टॉस असल्याचा आणि दीर्घकाळ वापरामुळे अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्क-आधारित बेबी पावडरची विक्री बंद केली, तर त्यानंतर जागतिक स्तरावरही कॉर्नस्टार्च-आधारित बेबी पावडरकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.







