भाजपने लोकसभा निवडणुकीतील १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून यात अभिनेत्री कंगना रणौत, काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल, माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय आणि अभिनेते अरुण गोविल आदींना स्थान दिले आहे.
कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधील मंडी या तिच्या जन्मस्थळावरून लढत देणार आहे. तर, एक दिवसापूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नवीन जिंदल हरयाणातील कुरुक्षेत्रमधून लढत देतील. भाजपने उत्तर प्रदेशमधील पिलभित मतदारसंघातून वरुण गांधी यांचे नाव वगळले असून त्यांच्या जागी काँग्रेसचे माजी नेते जितिन प्रसाद यांना तिकीट दिले आहे. तर, त्यांची आई आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची सुलतानपूरची जागा कायम ठेवली आहे.
हे ही वाचा:
उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान आग; पुजाऱ्यासह १३ जण जखमी
तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
दूरदर्शनवरील रामायण या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते अरुण गोविल यांना मेरठची जागा देण्यात आली आहे. तर, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांना पश्चिम बंगालमधील तमलूक मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्जुन सिंग आणि तपस रॉय यांना अनुक्रमे बराकपोर आणि कोलकाता उत्तर जागेवरून तिकीट देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचा माजी नेता शाहजहाँ शेख याच्या विरोधात संदेशखालीत आंदोलन करणाऱ्या रेखा पत्रा यांनाही भाजपने तिकीट दिले आहे. त्या बशिरहाट जागेवरून लढतील.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ओडिशातील संभलपूर आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरीमधून लढतील. गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कृष्णनगर राजघराण्यातल्या राजमाता अमृता रॉय कृष्णनगरमधून लढत देतील. त्यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना तिकीट देण्यात आले आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाड जागेवरून लढत देतील. तर, झारखंड मुक्ती मोर्चाच्या माजी आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन या डुमका मतदारसंघातून लढतील.