सेक्स स्कँडलमधील आरोपी आणि जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवण्णा यांची तुलना कृष्णाशी केल्याने कर्नाटकचे मंत्री रामाप्पा तिम्मापूर हे पुन्हा वादात आले आहेत.काँग्रेसप्रणित सरकारमध्ये अबकारी मंत्री असणारे तिम्मापूर यांचा व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. यात तिम्मापूर हे प्रज्वल रेवण्णाबाबत बोलत असताना त्याची तुलना कृष्णाशी करताना दिसत आहेत.
‘पेनड्राइव्हच्या मुद्द्याबाबत बोलायचे झाले तर, देशात यापेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही. याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार होऊ शकतो. श्रीकृष्ण अनेक स्त्रियांसोबत भक्तीभावाने एकत्र राहत होते. प्रज्वलच्या बाबतीत तसे नव्हते. मला वाटते की त्याला तो विक्रम मोडायचा आहे,’ असे विजयपुरा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री कन्नडमध्ये बोलले.
हे ही वाचा:
प्रज्वल रेवण्णा यांच्याकडे होता डिप्लोमॅटिक पासपोर्ट!
विवस्त्र करून मारहाण केल्यामुळे कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या
कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…
सुषमा अंधारेंना घ्यायला आलेल्या हेलीकॉप्टरला महाडमध्ये अपघात
मात्र तिम्मापूर यांच्या या विधानाने संताप उसळला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.‘कर्नाटक सरकारमधील काँग्रेस नेत्याने भगवान श्रीकृष्णाचा अपमान केला आहे. त्यांना मंत्रिमंडळ आणि पक्षातून तात्काळ काढून टाकावे अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू,” असे भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री सीटी रवी यांनी सांगितले.
प्रत्युत्तरात, काँग्रेसने तिम्मापूर यांच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. ‘मी या विधानाचा निषेध करते. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. रेवण्णा एक राक्षस आहे. ही पक्षाची भूमिका नाही,’ असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी स्पष्ट केले.