34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषकठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो

कठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो

शिंदे हे मूळ शिवसैनिक असल्याची आठवण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झाली आहे.

Google News Follow

Related

पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे गेले चार महिने ज्यांचा सकाळ संध्याकाळ गद्दार म्हणून उल्लेख करतायत ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ शिवसैनिक असल्याची आठवण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झालेली आहे. याचे श्रेय अर्थात भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आहे. घटनाबाह्य सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी वेळ मागितला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाय उतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांचा पाणउतारा करण्याची स्पर्धा उद्धव सेनेच्या नेत्यांमध्ये लागलेली आहे. ठाकरे पिता-पुत्र यात सर्वात आघाडीवर आहेत. त्यानंतर सर्वात वरचा क्रमांक शिवसेना नेते संजय राऊत यांचा होता. पत्राचाळ प्रकरणाने राऊत यांचा बाजार उठला, त्यानंतर किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, सुषमा अंधारे किल्ला लढवतायत. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत मिळतील ते शेलके शब्द शोधून त्यांच्यावर प्रहार करणे, खोके सरकार म्हणून त्यांचा उद्धार करणे हे प्रकार या गँगचे रोजचे काम. परंतु काचेच्या घरात राहणाऱ्यांना दुसऱ्यावर दगड भिरकावताना थोडा विचार करण्याची गरज असते. आता या काचेच्या घरांवर बुलडोजर चालण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे दगड भिरकावणाऱ्यांना जुने ऋणानुबंध आठवू लागले आहेत. एकनाथ शिंदे हे गद्दार असले तरी मूळचे शिवसैनिक असल्याचे स्मरण झाले आहे.

या भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या भाऊ आहे, असे म्हणून सर्वांना धक्का दिला. ते त्यांचे काम पक्षाच्या एजेंड्याप्रमाणे चोख बजावत असतात, या शब्दात कौतुक सुद्धा केले. हे किरीट सोमय्या तेच आहेत, ज्यांचा उल्लेख संजय राऊत हरामखोर, भडवा अशा वाट्टेल त्या शब्दात करायचे. सोमय्या यांना तुरुंगात डांबण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रचंड जोर लावला. त्यांचा मुलगा नील आणि पत्नी मेधा यांनाही अडकवण्यासाठी कायद्याचे फासे टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रकरणे पोकळ निघाली, पुरावेच नसल्यामुळे आरोपातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. किरीट सोमय्या यांच्या कारवर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला करेपर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. तेव्हा कधी किशोरी पेडणेकर यांनी चोख काम बजावणाऱ्या आपल्या भावाची पाठराखण केल्याचे ऐकीवात नाही. परंतु त्यांनी किरीट सोमय्या आपला भाऊ आहे, असे म्हटल्यावर त्यावर विश्वास ठेवायला हवा. हनुमानाला त्या भाऊबीज करतात. हनुमान पाठीराखा असल्याचे सांगितले.
हनुमान संकट मोचक आहे, आता डोळ्यासमोर तुरुंग दिसू लागल्यानंतर किशोरी पेडणेकर यांना हनुमानाची आठवण होणे स्वाभाविक आहे. ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

भाऊ म्हटल्यानंतरही किरीट सोमय्या पक्षाने दिलेली कामगिरी चोख बजावतायत. वरळीतील एसआरए घोटाळा त्यांनी उघड केला आहे. गोमाता एसआरए प्रकल्पात पेडणेकर बाईंनी लाटलेली घरे आणि गाळे यांची माहिती त्यांनी उघड केली आहे. मृत भावाच्या नावावरही फ्लॅट घेतल्याचा आरोप केला आहे, तसे पुरावे दिले आहेत. एसआरए प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या पालिकेतील वसाहत अधिकारी याला राजकीय वरदहस्त कोणाचा असा सवाल करून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही पेडणेकर बाईंची कोंडी केली आहे.

मनसेने ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका एसआरए प्रकल्पाची तक्रार केली असून या प्रकल्पात मूळ ६३ घरे असताना इथे बोगस रहीवासी दाखवून १८८ घरे वाढवण्यात आली. वाढवलेली ही घरे भरपूर पैसे घेऊन विकण्यात आली. काही लोकांना घरे देण्यासाठी पैसे घेतले परंतु घरे मिळाली नाहीत. अशा नऊ जणांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर चंद्रकांत चव्हाण सह चौघांना अटक झाली. इथे चंद्रकात चव्हाणची झोपडी आहे.

कधी काळी किशोरी ताई या वॉर्डात नगरसेविका होत्या, त्यानंतर वॉर्ड बदलला. त्यांच्या दोन्ही वॉर्डात एसआरए घोटाळा झाला असून दोन्ही ठिकाणी चंद्रकांत चव्हाण आहे. वरळीच्या गोमाता एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांच्यासोबत चंद्रकात चव्हाणचेही घर आहे. ही माहिती सोमय्या आणि देशपांडे यांनी उघड केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे कट्टर शिवसैनिक असल्याची आणि आणि उपमुख्यमंत्री सजग असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

हे ही वाचा:

फडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो

प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?

खोटे ‘सोने’ देऊन २० लाखांना फसवले

रस्ते अपघातात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख

 

जोवर चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत आपली सत्ता कायम राहील असे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेतील अनेकांना वाटत होते. त्यामुळे आपण केलेली लूट कधी उघड होणार नाही, चालवलेला सत्तेचा वरवंटा कोणाला रोखता येणार नाही, असा अनेकांचा गैरसमज होता. त्यामुळे अजीर्ण होईपर्यंत खाबूगिरी सुरू होती. आता त्याचे करपट ढेकर यायला सुरूवात झाली आहे.

कॅगमार्फत महापालिकेतील १२ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक असल्याची आठवण होऊ शकते. खोक्यांवर गुजराण करणाऱ्यांनी यापुढे खोक्यांचे आरोप करताना विचार केलेला बरा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा