कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आज (१ जुलै) विधानसभेत गदारोळ पहायला मिळाला. शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी करत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या डायसवर चढत राजदंडाला हात लावला. अध्यक्षांवर धावून जाणे योग्य नसून पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले.
अधिवेशनात पटोले म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, यावेळी नाना पटोले अध्यक्षांजवळ धावून जाताना दिसले. यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एख्याद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणे हे अशोभनीय आहे.
जणू काही अध्यक्षच दोषी आहेत, अशा प्रकारे धावून जाणे हे आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत. लोक वर गेली आहेत, पण ही कुठली पद्धत?, अध्यक्षांवर धावून जाण्याची पद्धत अयोग्य. नाना पटोले स्वतः अध्यक्ष राहिले आहेत, त्यानुसार अध्यक्षांवर धावून जाणे चुकीचे आहे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
हे ही वाचा :
श्रावणात या गोष्टींपासून राहा दूर
ट्रम्प यांनी एलन मस्कना काय दिली धमकी ?
व्हिक्टोरिया रुग्णालयात लागली आग
हत्तींसाठी ३१ दिवसांची कसली वैद्यकीय थेरेपी ?
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करत नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले. सभागृहात असंसदीय भाषा वापरणे योग्य नाही, हे चुकीचे आहे, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. यानंतर त्यांनी कारवाई करत नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले. दरम्यान, नाना पटोले यांच्या निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या सरकारमधले कृषिमंत्री, आमदार शेतकाऱ्यांना भिकारी समजतात, पण आम्ही हे सहन करणार नाही, याविरुद्ध आम्ही रोज आवाज उठवू. एक दिवस नाहीतर रोज निलंबित केले तरी आम्ही थांबणार नाही. राज्याचे कृषिमंत्री आणि लोणीकर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, मुख्यमंत्री माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
