भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला! ऋषभ पंतने हेडिंग्लेच्या मैदानावर आपलं सातवं टेस्ट शतक झळकावत महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतने १३४ धावा फटकावत भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
धोनीच्या ६ शतकांचा विक्रम पंतने पार केला आणि भारतासाठी सर्वाधिक टेस्ट शतक करणारा यष्टिरक्षक म्हणून इतिहासात आपलं नाव कोरलं. इंग्लंडमध्ये हे त्याचं तिसरं टेस्ट शतक ठरलं – आणि विशेष म्हणजे, आजवर एकाही परदेशी यष्टिरक्षकाने इंग्लंडमध्ये दोनहून अधिक टेस्ट शतक झळकावलेले नाहीत!
शतक साजरं करताना पंतने बालपणीचं कौशल्य दाखवलं – एक जोरदार फ्रंट हँडस्प्रिंग!
पंत म्हणतो, “शतकानंतर मनात तीन सेलिब्रेशन स्टाईल्स होत्या – डेली अलीचा OK साईन, शांत सेलिब्रेशन, आणि शेवटी, मी तेच केलं जे मी लहानपणापासून करतो – हँडस्प्रिंग!“
“जिमनॅस्टिकचा सराव लहानपणीच केला होता. रात्री उठवले तरी करू शकतो!”
शतक साजरं करताना पंतनं शोएब बशीरच्या एका चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने एका हाताने षटकार ठोकला. तो म्हणतो, “शतक जवळ होतं, पण मी रिस्क घ्यायची नाही ठरवलं. पण पुढच्या ओव्हरमध्ये मी बशीरला आधीच सांगितलं होतं – फिल्ड क्लोज ठेवलात तर मोठा शॉट मारेन!“
…आणि तोच केला!
आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपरजायंट्ससाठी अपयशी सत्रानंतर, आणि आरसीबीविरुद्धचं एकमेव शतक, आता टेस्ट क्रिकेटमध्ये ही जबरदस्त पुनरागमनाची कहाणी लिहिली जाते आहे.
“आता मी ‘व्ही’ मध्ये खेळण्यावर भर देतोय. ऑफसाइडला वाईड गेलेल्या चेंडूंवर फार हात मारत नाही. आणि प्रत्येक चेंडूवर मी विचार करतो की समोरचा गोलंदाज काय विचार करतोय.”
त्याचं डिफेन्स आता अधिक पक्का झालंय. तो म्हणतो, “जेव्हा एखादा बॉलर सेट असतो, तेव्हा मी चेंडू सोडतो किंवा बचाव करतो. पण तो लयेत नसेल, तर त्याच्यावर दडपण टाकतो. हे संतुलन मला जमतंय आणि याचा मी खूप आनंद घेतोय!“
पंतच्या परफॉर्मन्सवर महान फलंदाज सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया ही खास होती. एकेकाळी मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्टमध्ये पंतच्या आऊटवर गावसकर म्हणाले होते – “बेवकूफ, बेवकूफ, बेवकूफ!“
आता शतक झाल्यावर, त्याच गावसकरांनी प्रतिक्रिया दिली – “शानदार, शानदार, शानदार!“
“मी माझ्या चुका सुधारल्या, खूप मेहनत घेतली, क्रिकेटविषयी शिस्त ठेवली आणि त्यामुळे मी आज इथे पोहचलो आहे. खूप समाधान वाटतं!” – ऋषभ पंत.
