पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (२६ मे) गुजरातमधील वडोदरा येथे रोड शो केला आणि त्यांच्या दोन दिवसांच्या गृहराज्य गुजरात दौऱ्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे. रोड शोचे दृश्ये ऑनलाइन समोर आली आहेत, ज्यात पंतप्रधान मोदी गर्दीला हात हलवत असताना आणि लोक फुलांच्या त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी ८२,००० कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी प्रथम दाहोदला भेट देतील आणि तिथे लोको मॅन्युफॅक्चरिंग शॉप-रोलिंग स्टॉक वर्कशॉपचे उद्घाटन करतील. उद्घाटनानंतर, ते दाहोदमधील खारोड येथे जनतेला संबोधित करतील आणि २४,००० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि इतर सरकारी प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील.
यानंतर ते सोमनाथ-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि दाहोदमध्ये ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत २१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून उभारण्यात आलेल्या रेल्वे उत्पादन युनिटचे उद्घाटन करतील. यासह १८१ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या चार ‘पेयजल सुधारणा गट पाणीपुरवठा योजनां’चे उद्घाटन करणार आहेत. या योजनांमुळे महिसागर आणि दाहोद जिल्ह्यातील १९३ गावे आणि एका शहरातील ४.६२ लाख लोकसंख्येला १०० एलपीसीडी (प्रति व्यक्ती लिटर) दराने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे.
या कार्यक्रमांनंतर, पंतप्रधान मोदी भूजला भेट देतील, जिथे ते ५३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये कांडला बंदरातील पायाभूत सुविधा प्रकल्प, सौर प्रकल्प, वीज पारेषण प्रणाली आणि रस्ते बांधकाम यांचा समावेश असेल. लाभार्थी जिल्ह्यांमध्ये कच्छ, जामनगर, अमरेली, जुनागढ, गिर सोमनाथ, अहमदाबाद, तापी आणि महिसागर यांचा समावेश असेल.
संध्याकाळी ७:३० वाजता, पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळ ते इंदिरा ब्रिजपर्यंत ३ किमी लांबीचा रोड शो करतील. ५०,००० हून अधिक भाजप कार्यकर्ते आणि नागरिक त्यांचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. ते गांधीनगरमधील राजभवनात रात्रीचा मुक्काम करतील.
हे ही वाचा :
मुंबईत मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली, विमान आणि लोकल गाड्यांवर परिणाम!
‘हे’ अस्त्र न लढता विजय मिळवून देईल.
‘ त्यांचे’ ट्रम्प यांच्याबद्दलचे भाकीत एका महिन्यात सत्य ठरले..
नको ती बडबड थांबवा…पंतप्रधानांचा एनडीए नेत्यांना कडक इशारा!
२७ मे रोजी सकाळी १०:३० वाजता, पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये २ किलोमीटर लांबीचा रोड शो करतील, जिथे ३०,००० हून अधिक भाजप कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. रोड शोनंतर, ते महात्मा मंदिर येथे ५,५३६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १,००६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या २२,०५५ घरांचे उद्घाटनही करतील आणि १,००० कोटी रुपये खर्चून विकसित होणाऱ्या साबरमती नदीकाठाच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी करतील. शिवाय, स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजनेंतर्गत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ३,३०० कोटी रुपयांचे धनादेश वितरित केले जातील.
