भारतीय हवाई दलाने (IAF) ८ ऑक्टोबर रोजी त्यांचा ९३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी हवाई दल प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली. याचसोबत एअर फोर्स डे निमित्त आयोजित केलेल्या डिनरची चर्चा सध्या सुरू आहे. डिनर मेनूने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा घडवली असून यातून पाकिस्तानला डिवचण्याचे कामही सुरू आहे. यंदाचा डिनर मेनू हा चवीमुळे चर्चेचा विषय बनला नाही तर त्यात समाविष्ट असलेल्या पदार्थांची नावे पाहून हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
कार्यक्रमातील डिनर मेनूचे शीर्षक आहे “आयएएफची ९३ वर्षेः अचूक, अस्पष्ट आणि दक्ष” तर मेनूमधील पदार्थांची नावे पाकिस्तानी तळांवरून देण्यात आली आहेत. या मेनू कार्डचा फोटो व्हायरल झाला आहे. मेनूमध्ये रावळपिंडी चिकन टिक्का मसाला, रफीकी रारा मटन, भोलारी पनीर मेथी मलाई, सुक्कूर शाम सवेरा कोफ्ता, सरगोधा दाल मखानी, जेकोबाबाद मेवा पुलाव आणि बहावलपूर नान यांचा समावेश आहे. मिठाईंमध्ये बालाकोट तिरामिसू, मुझफ्फराबाद कुल्फी फालुदा आणि मुरीदके मिठा पान यांचा समावेश आहे.
हेही वाचा..
देशाची सेवा करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे
बिहारमध्ये एनडीए बनवेल मजबूत सरकार
पाकिस्तानच्या ठिकाणांची ही नावे भारताने दहशतवादाविरुद्ध केलेल्या अचूक लष्करी कारवाईशी संबंधित आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि २०२५ चा ऑपरेशन सिंदूर. या वर्षी ७ मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये मुरीदके आणि बहावलपूर सारखे भाग समाविष्ट होते, जे दोन्ही लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असल्याचे मानले जाते. दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून २०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्यात पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील जैश-ए-मोहम्मदचे प्रशिक्षण तळ उध्वस्त झाले होते.







