भारतीय कर्णधार रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. आता भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत रोहितच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे.
आजपर्यंत रोहित शर्माने १८६ वनडे डावांत ९,१७१ धावा केल्या आहेत, तर गांगुलीने २३६ डावांत सलामीवीर म्हणून ९,१४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे रोहित आता जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर (१५,३१० धावा, ३४० डाव) असून, दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (१२,७४० धावा, ३८३ डाव) आहे. तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (१०,१७९ धावा, २७४ डाव) आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (९,२०० धावा, २५९ डाव) आहेत.
रोहित शर्मा काही काळानंतर पुन्हा भारतासाठी वनडे मालिकेत खेळताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो १४ चेंडूंमध्ये केवळ ८ धावा करून बाद झाला होता. त्याने शेवटचे शतक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी कटक येथे इंग्लंडविरुद्ध झळकावले होते.
सध्या टीम इंडिया एडिलेड येथे ‘करो या मरो’ सामन्यात उतरली आहे. पर्थमध्ये झालेला पहिला सामना भारताने गमावला असून, मालिका वाचवण्यासाठी आजचा विजय आवश्यक आहे. एडिलेडमध्ये भारताचा विक्रम प्रभावी असून, येथे १५ सामन्यांपैकी ९ विजय, ५ पराभव आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे.







