28 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरविशेषसंभाजी भिडे आणि पुरोगामी किडे

संभाजी भिडे आणि पुरोगामी किडे

भिडे प्रकरणामुळे तथाकथित पुरोगाम्यांना भरघोस खाद्य मिळाले

Google News Follow

Related

फुकट काही मिळतेय म्हटले की, रांगा लावणाऱ्यांची आणि हवे तेवढे ओरपून पोट भरणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. तथाकथित पुरोगाम्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नसते. आपली भूक भागविण्यासाठी ते काहीही मिळेल त्यावर तुटून पडतात. संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराच्या बाबतीत केलेल्या विधानावरून सध्या या तथाकथित पुरोगाम्यांना भरघोस खाद्य मिळाले आहे. बरेच दिवसांनी असे काही मिळाल्यामुळे त्यांचा तोल सुटला आहे आणि ते त्यावर तुटून पडले आहेत.

त्याचे झाले असे की, संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांना त्या भेटीसंदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या महिला पत्रकाराने टिकली लावलेली नाही, असा आक्षेप घेत भिडे म्हणाले की, स्त्री म्हणजे भारतमातेचे रूप आहे. तेव्हा तू टिकली लाव मगच मी बोलतो तुझ्याशी. त्यावरून मग हा सगळा राडा सुरू झाला. सदर पत्रकाराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा अवघ्या महाराष्ट्राचा झालेला भयंकर अपमान तातडीने शेअर करत आपण कसे सावित्रीबाईची लेक आहोत, मनुस्मृती नाकारणाऱ्या आहोत असे सांगत या पत्रकाराने भिडेंचा निषेध केला. एवढे मोठे खाद्य मिळाल्यावर तथाकथित पुरोगामी चवताळून उठले. सगळीकडे भिडेंचा उद्धार, त्यांच्यावर लेख, कविता, मिम्स यांचा पाऊस पडू लागला. स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या अनेक महिलांनी टिकली न लावलेले फोटो टाकून कृतकृत्य झाल्याचे भाव व्यक्त केले. निखिल वागळे यांनी तर भिडे यांना तुरुंगातच टाकले पाहिजे असे विधान केले. असे काही घडले की पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान हा ठरलेलाच. त्याप्रमाणे तो झालेला आहे. आता महाराष्ट्राला सन्मान देण्याची जबाबदारी या तथाकथित पुरोगाम्यांची. अपमान काय तो हेच ठरवणार आणि तो अपमान दूर करण्यासाठीही आपल्यालाच सगळे अधिकार मिळालेत असाही त्यांचा समज आहे. त्यासाठी ते सगळे एकवटले. आता महाराष्ट्राला आपल्याशिवाय कुणीही वाचवू शकत नाही, अशी धारणाच त्यांनी करून घेतली आहे.

या तथाकथित पुरोगाम्यांचे एक बरे असते त्यांना आपल्या भूमिका हव्या तशा वाकवता येतात, दुटप्पी भूमिका घेता येतात. टिकली, बांगड्या, भारतीय संस्कृती, परंपरा वगैरे मुद्दे आले की, त्यांच्यातला पुरोगामी जागा होतो. तोच हिजाबचा मुद्दा आला की, हा पुरोगामी झोपेचे सोंग घेतो. तेव्हा त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही. संभाजी भिडे हे त्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व. त्यांनी बोलायची खोटी की पुरोगामी छाती पुढे काढून महाराष्ट्र वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. मुळात भिडे यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नव्हती. ते शिंदे यांना भेटून निघालेले असताना सदर पत्रकाराने त्यांना गाठले आणि आता आपल्यासोबत आहेत संभाजी भिडे असे म्हणत त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. भिडे यांनी आपले मत त्या पत्रकाराला ऐकवले. भिडे यांचे वक्तव्य पसंत पडले नसेल तर त्यांना तिथेच प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. पण सदर पत्रकाराने तो व्हीडिओ शेअर करत आपण कसे पीडित आहोत, पुरोगामी महाराष्ट्राचा कसा अपमान झाला आहे, आपल्याला कसे काहीही बोलण्याचे, काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे हे सांगण्यास सुरुवात केली.

हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य भिडे यांनाही आहे. त्यांनी कोणतीही वाईट भाषा तिथे वापरलेली नाही. पण तुमच्यात भारतमातेचे रूप दिसते आहे आणि तुम्ही टिकली लावायला हवी असे जर ते म्हणाले असतील तर त्यात वाईट वाटण्यासारखे किंवा महिलांचा अपमान झाल्याचे वाटण्याची अजिबात गरज नव्हती. आणि वाटलेच असेल तर तेव्हाच भिडे यांना ते सांगायला हवे होते. पण तेव्हा बोलायचे नाही आणि नंतर सोशल मीडियावर आपले रडगाणे गायचे. टिकली किंवा कुंकू लावणे हे काय भारतात प्रथमच होते आहे की काय? इथे पुरोगामी प्रश्न विचारतात की, कुंकू लावायचे अथवा नाही याची निवड आम्ही करणार. नक्कीच तो महिलांचा अधिकार आहे. पण तथाकथित पुरोगामी याबाबतीत दुटप्पी भूमिका घेतात. सण उत्सवांत, पूजासमारंभात साड्या नेसणार, बांगड्या भरणार, कुंकू लावणार तेही स्वतःच्या निवडीनुसार नाही तर प्रथा, परंपरेचा भाग म्हणूनच. जर तुम्हाला टिकली लावणे, बांगड्या भरणे, साडी नेसणे, मंगळसूत्र घालणे ही मागासलेपणाची लक्षणे वाटतात तर कोणत्याही सणउत्सवातही ती आभूषणे घालू नका आणि महाराष्ट्रावर उपकार करा. स्वतःला सोयीचे वाटेल तेव्हा पुरोगामी असल्याचे सोंग घ्यायचे आणि एरवी सण उत्सवात मात्र परंपरा पाळायची.

हिजाबच्या बाबतीत दुतोंडी भूमिका

भारतात सध्या हिजाबवरून न्यायालयात खटला सुरू आहे. कर्नाटकापासून हा वाद उफाळला. शाळेत हिजाब घालायला द्या, तो आमचा अधिकार आहे, अशी मागणी काही विद्यार्थींनींनी केली. त्यावरून देशभरात आंदोलनेही झाली. त्यावर ही सगळी तथाकथित पुरोगामी मंडळी मूग गिळून गप्प होती. कुणीही तेव्हा महिलामुक्तीचा संदेश देत पुढे आले नाही. अगदी इराणमध्ये हिजाबविरोधात अनेक महिलांनी प्राण दिले तरीही या पुरोगाम्यांचे हृदय द्रवले नाही. पण आता टिकलीचा मुद्दा उपस्थित होताच, सगळे बिळातून बाहेर आले आणि महाराष्ट्राला प्रतिगामी होण्यापासून वाचविण्यासाठी पुढे सरसावले.

महिला मुक्तीचे यांचे अर्थ प्रत्येकवेळेला बदलत असतात. मुस्लिम महिलांना बुरख्यात अडकून ठेवण्यात येत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना धर्मानुसार मिळालेला आहे त्यामुळे त्यात आपण लक्ष घालण्याची गरज नाही, असे यांचे मत असते पण हिंदू धर्मातील प्रथा, परंपरेबद्दल मात्र त्यांचे मत नेमके उलट असते. त्यामुळेच भिडे यांनी टिकली लाव असे पत्रकाराला सांगताच या तथाकथित पुरोगाम्यांना संताप अनावर झाला. खरे तर हिजाबच्या बाबतीत इराणप्रमाणे भारतीय महिलांनीही रस्त्यावर उतरून त्यांना समर्थन द्यायला हवे होते, सोशल मीडियावर ट्रेन्ड चालवायला हवे होते, पण कसले काय? फक्त टिकली, बांगड्यांचा विषय निघाला की यांना चेव चढतो नाहीतर यांच्या डोळ्यांवर पट्ट्या असतात आणि कानावर हात. कपाळावर कुंकू लावणे किंवा टिळा लावणे याला काही पारंपरिक संदर्भ आहेत, ते यांना माहीत नाहीत असे नाही पण तिथे त्यांच्यात महिलामुक्तीचे वारे शिरतात. त्यातून मग उघडेबोडके हात, टिकली नसलेली कपाळे दाखवून आम्ही ही परंपरा मानत नाही म्हणून दाखवले जाते. पण सणउत्सवाला हेच चेहरे नटूनथटून तयार असतात.

हे ही वाचा:

चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी

‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले

ड्रग तस्करितून मिळविले कोटी रुपये ; जप्त झाली संपत्ती

आदित्य ठाकरेंनी यापूर्वी पत्रकार परिषदा का घेतल्या नाहीत?

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर या प्रकरणाची दखल घेतली. महाराष्ट्राचा कसा अपमान झाला, कसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा पाढा त्यांनी आपल्या पत्रातून वाचून दाखवला. हे पत्र त्यांनी भिडे यांना लिहून खुलासा मागवला आहे. त्या स्वतःला पुरोगामी मानत असल्यामुळे लागलीच पुढे सरसावल्या असाव्यात. पण याच चाकणकर एरवी वेगवेगळ्या सणासुदीला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, दिपावलीच्या शुभेच्छा देताना दिसतात. प्रथा परंपरेनुसार सर्व सण साजरे करतानाचे त्यांचे व्हीडिओ फोटो प्रसिद्ध होतात, मग तेव्हा ते स्वतःची आवडनिवड म्हणून करतात की प्रथा परंपरा म्हणून. ही प्रथा परंपरा वाडवडिलांपासून चालत आली आहे, त्यांनी सांगितले म्हणून त्यांची मुले ही परंपरा जपत आली आहेत. मग आज अचानक कुणी टिकली लावायला सांगितली म्हणून अपमान कसा काय होतो?

बरे हे सगळे फक्त भिडे गुरुजींनी एक काय ते वाक्य म्हटले म्हणून. पण याआधी अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या तेव्हा राज्य महिला आयोगाकडून कोणती कठोर कारवाई करण्यात आली. फोनवरून स्वप्ना पाटकर यांना आईबहिणीवरून शिव्या घालणाऱ्या संजय राऊत यांच्या ऑडिओबद्दल महिला आयोगाची काय भूमिका होती? फडणवीसांवर आरक्षण मागतोय बायको मागत नाही अशी विधान करणाऱ्याबाबत काय भूमिका होती, महिलांबद्दल असभ्य भाषेत टिप्पणी करणाऱ्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत कधी काही विचारणा आयोगाने केली का? केतकी चितळेला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली तेव्हा आयोगाने काय पावले उचलली. तेव्हा टिकलीवरून एवढे संतप्त होताना आपण केव्हा सोयीस्कर मूग गिळून गप्प होतो, हेदेखील आठवावे.

आणि शेवटचे म्हणजे मध्यंतरी एक मोहीम चालविण्यात आली होती ती म्हणजे विधवा महिलांना मानसन्मान. पतिचे निधन झाल्यानंतरही महिलांनी कुंकू कपाळावर ठेवायचे, गळ्यात मंगळसूत्र घालायचे, पायात जोडवी घालायची. सुप्रिया सुळे यांचा या मोहिमेला जबरदस्त पाठिंबा होता. म्हणजे विधवा झाल्यानंतर सौभाग्याशी संबंधित आभूषणे घालायची आणि पती जिवंत असताना मात्र टिकली लावू नका, बांगड्या घालू नका ते गुलामीचे लक्षण आहे, असे म्हणायचे. संभाजी भिडेंच्या निमित्ताने हे पुरोगामी किडे समोर आले, हे बरे झाले एवढेच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा