चेन्नई विमानतळाजवळ येणाऱ्या विमानांवर लेझर लाइट चमकवणाऱ्या संशयितांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी ग्रेटर चेन्नई पोलिसांनी मोहिमेचा वेग वाढवला आहे. यासाठी विशेष पथकेही तयार करण्यात आली आहेत. ही एक वाढती समस्या असून, ती विमान वाहतुकीच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. पोलीस आकडेवारीनुसार, २०२५ पासून आतापर्यंत लेझरशी संबंधित एकूण २५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. सर्वात अलीकडील घटना १० जून रोजी घडली, जेव्हा पुण्याहून येणाऱ्या प्रवासी विमानावर हिरव्या रंगाची लेझर बीम चमकवण्यात आली होती. त्या वेळी, लँडिंगच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पायलटला दिसण्यात अडथळा निर्माण झाला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये अशा ७० घटना नोंदवण्यात आल्या, तर २०२३ मध्ये ५१ प्रकरणे समोर आली होती. या धोकादायक प्रवृत्तीमुळे विमानवाहतूक आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, याआधीच्या दोन घटनांमध्ये दुबईहून येणाऱ्या विमानांवर लेझर बीम टाकण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये पायलटांनी विमानतळ प्रशासनाकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा..
बिहारच्या फल्गु नदी पाणीपातळीत अचानक वाढ
पुणे अपघात : पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत मिळणार
रांची, पटणामधील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी
‘या’साठी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या!
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, लँडिंगच्या वेळी लेझर बीम पायलटच्या दृष्टीला गंभीरपणे विचलित करू शकते, किंवा काही काळासाठी अंधत्व आणू शकते. लँडिंग हा विमानाच्या प्रवासातील सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. नागरिक विमानन महासंचालनालयाचे (DGCA) एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “पायलट लँडिंग दरम्यान पूर्णपणे स्पष्ट दृष्टी आणि लक्ष केंद्रित करून काम करतात. अशा वेळी लेझर लाइट अचानक चमकल्यास त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये प्रवासी व चालक दलाच्या सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो.
प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की लेझर किरणे सेंट थॉमस माउंट आणि पल्लावरम या दोन्ही रहिवासी भागांतून आल्या होत्या. हे दोन्ही भाग विमानतळाच्या प्रवेश मार्गाच्या जवळ आहेत. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी या भागांमध्ये विशेष रात्रीच्या गस्ती सुरू केल्या आहेत. विमानतळाभोवतीच्या परिसरात गस्त व देखरेख वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, विमानतळ परिसराजवळ लेझर उपकरणांचा वापर करणे हा एक गुन्हा आहे आणि तो भारतीय विमान वाहतूक सुरक्षा कायद्यांतर्गत शिक्षेस पात्र आहे. चेन्नई पोलिसांचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, अशा प्रकारच्या वर्तनात सहभागी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
