कधी विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने रात्रभर रडणारी ती मुलगी… आज त्याच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा विजय लिहून गेली. नाव — जेमिमा रॉड्रिग्ज!
डी. वाय. पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात जेमिमाने १३४ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह नाबाद १२७ धावा ठोकत भारताला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला असून २ नोव्हेंबरला सामना होणार आहे दक्षिण आफ्रिकेशी.
रात्रीचे अश्रू, सकाळची झुंज
२०२२ मध्ये जेव्हा जेमिमाला विश्वचषक संघात स्थान मिळालं नाही, तेव्हा ती रात्री-रात्रीभर रडायची. पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये तिने स्वतः सांगितलं — “मी रडायचे, पण थांबले नाही. स्वतःला पुन्हा घडवलं.”
आणि आज तीच मुलगी भारतीय क्रिकेटचा अभिमान बनली आहे.
मैदानावरचा वादळ
भारताला ३३९ धावांचं लक्ष्य — पण जेमिमाचं बॅटिंग पाहून असं वाटत होतं,
“ही केवळ रन चेस नाही, हा तिच्या आयुष्याचा रिव्हेंज मॅच आहे!”
कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत १६७ धावांची भागीदारी — प्रत्येक चौकारात तिच्या आयुष्याची झुंज होती, प्रत्येक रनमध्ये तिचं स्वप्न जिवंत होतं.
क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव
माजी खेळाडूंपासून ते चाहत्यांपर्यंत सगळीकडून स्तुतीचा पाऊस!
मोहम्मद कैफ म्हणाले – “जीवनातील सर्वात सुंदर पारी! टीममधून आत-बाहेर होत राहिली, पण कधी हार मानली नाही. डी. वाय. पाटीलची खरी स्टार जेमिमा आहे.”
सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केलं – “शाबास जेमिमा आणि हरमनप्रीत! श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीने सामना जिवंत ठेवला. तिरंगा असाच लहरत राहो!” 🇮🇳
इरफान पठाण म्हणाले – “शांतपणे, संयमाने केलेला हा चेज पाहून मन भारावलं. जेमिमा आणि हरमनप्रीत अप्रतिम!”
राजीव शुक्ला (बीसीसीआय उपाध्यक्ष) म्हणाले – “जेमिमाचं शतक आणि हरमनप्रीतची नेतृत्वगुण – भारतीय क्रिकेटसाठी हा गौरवाचा क्षण!”
मुंबई क्रिकेट असोसिएशनने लिहिलं – “जेमिमाने संयम, सौंदर्य आणि खरी मुंबईकर झुंज दाखवली. तिच्या बॅटमधून आज भारत बोलला.”







