भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत मोठं अपडेट दिलं आहे. सूर्यानं सांगितलं की अय्यरची तब्येत आता स्थिर आहे आणि तो मोबाईलवर मेसेजला उत्तर देतोय.
२५ ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात एलेक्स कॅरीचा झेल घेताना अय्यर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पुढे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत त्याच्या प्लीहनला (spleen) गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं.
सूर्यकुमार म्हणाला, “आम्ही त्याच्याशी बोललो आहोत. पहिल्या दिवशी जेव्हा समजलं की तो जखमी झालाय, मी लगेच त्याला फोन केला, पण त्याच्याकडे फोन नव्हता. मग आमच्या फिजिओ कमलेशला संपर्क केला. त्यांनी सांगितलं की अय्यरची स्थिती स्थिर आहे. पहिल्या दिवशी काहीही निश्चित सांगणं कठीण होतं.”
“गेल्या दोन दिवसांपासून आम्ही त्याच्याशी बोलतोय. तो उत्तर देतोय, म्हणजेच तब्येत सुधारतेय. डॉक्टर त्याच्यासोबत आहेत आणि अजून काही दिवस त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यात येईल. सध्या सगळं ठीक दिसतंय, आणि तो बोलतोय — हीच सर्वात चांगली बातमी आहे,” असं सूर्यानं सांगितलं.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे आणि टीम मॅनेजमेंट त्याच्याशी सतत संपर्कात आहे. त्याच्या रिकव्हरीवर जवळून लक्ष ठेवलं जात आहे.
सूर्यकुमार यादवनं नीतीश कुमार रेड्डीच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. एडिलेडमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात नीतीशच्या डाव्या कोपराला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सिडनीत झालेल्या शेवटच्या वनडेत खेळू शकला नाही.
सूर्या म्हणाला, “तो आता ठीक आहे. काल त्यानं नेट्समध्ये धावण्याचा आणि फलंदाजीचा सरावही केला. मंगळवारी तो ब्रेक घ्यायचा विचार करत होता, पण आमची टीम मीटिंग असल्याने तो सर्वांसोबत मैदानावर आला. तो संघाचा भाग राहू इच्छितो, ही खूप चांगली गोष्ट आहे.”







