भारतीय फलंदाज स्मृती मंधानानं न्यूझीलंडविरुद्धच्या शतकामुळे महिला वनडे क्रिकेटमध्ये आपला अव्वल क्रमांक आणखी मजबूत केला आहे. विश्वचषकातही तिचं शानदार प्रदर्शन सुरू असून तिची रेटिंग आता करिअरमधील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. तिची सलामी जोडीदार प्रतिका रावलनं तब्बल १२ स्थानांची झेप घेत २७व्या स्थानी मजल मारली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध १०९ धावांची खेळी आणि त्यानंतर बांग्लादेशविरुद्ध नाबाद ३४ धावा करत स्मृतीने ८२८ रेटिंग पॉइंट्स मिळवले असून ती पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलियाची अॅश गार्डनर (७३१) स्मृतीपेक्षा तब्बल ९७ गुणांनी मागे आहे. प्रतिका रावल ५६४ गुणांसह २७व्या स्थानी पोहोचली असली तरी दुखापतीमुळे ती उर्वरित विश्वचषक सामन्यांत खेळू शकणार नाही.
स्मृतीला सप्टेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दमदार प्रदर्शनामुळे ‘आयसीसी महिला खेळाडू ऑफ द मंथ’ हा किताब मिळाला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लौरा वोल्वार्ड्टनं दोन स्थानांची झेप घेत तिसऱ्या स्थानी प्रवेश केला आहे. इंग्लंडची एमी जोन्स चार स्थानांनी वर येत टॉप-१० मध्ये पोहोचली असून ती नवव्या स्थानावर (६५६) आहे. ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलंड १६ स्थानांनी उडी घेत १६व्या स्थानी पोहोचली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन (७४७) अव्वल स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाची अलाना किंग पाच स्थानांनी वर येत दुसऱ्या स्थानी तर तिची सहकारी अॅश गार्डनर एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
पाकिस्तानची नशरा संधू आणि दक्षिण आफ्रिकेची नॉनकुलुलेको म्लाबा (६१०) संयुक्तपणे दहाव्या स्थानावर आहेत. जलदगती गोलंदाज मारिजान कॅप आणि अॅनाबेल सदरलंड अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानी आहेत.







