परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील त्रिमुखी हनुमान मंदिरात शनिवारी भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील बांधकामाचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत तब्बल ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात जमले असताना ही घटना घडल्याने परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मंदिर परिसरात अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच बांधकामाचा भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली अनेक भाविक अडकले. जीव वाचवण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत धावाधाव केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
हे ही वाचा:
पश्चिम आशियातील शांततेचे संकेत
“पाकिस्तानात माध्यम स्वातंत्र्य नाही”
भाचीची छेड काढली म्हणून जाब विचारणाऱ्या आनंदकुमारचा नासिरने चिरला गळा
प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांविरोधात ढाकामध्ये हिंदू एकटवले
जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
यशवाडी येथील त्रिमुखी हनुमान मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे येथे दररोज आणि विशेषतः शनिवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. अशा वेळी घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, बांधकामाचा भाग नेमका कशामुळे कोसळला, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या दुर्घटनेस जबाबदार कोण, याचा सखोल तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. सध्या मात्र यशवाडी परिसरात शोककळा पसरली असून ७ निष्पाप भाविकांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे.







