अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ शनिवारी (२३ मे) त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी कोलकात्यात दाखल झाले. चार दिवसांच्या या दौऱ्यात ते नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. रुबिओ यांचा हा दौरा २३ ते २६ मे दरम्यान होणार असून भारत- अमेरिका संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कोलकात्यात आगमनानंतर ते गेल्या १४ वर्षांत या शहराला भेट देणारे पहिले अमेरिकन परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये तत्कालीन अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटोन यांनी कोलकात्याला भेट दिली होती. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गियो गोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रुबिओ यांच्या भारत आगमनाची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, रुबिओ नंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतील. व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, क्वाड आणि इतर अनेक विषयांवर पुढील काही दिवसांत चर्चा आणि प्रगती होईल, असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अद्याप रुबिओ यांच्या कोलकाता दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नसला, तरी त्यांनी सध्या ‘मदर हाऊस’ला भेट दिली आहे. मदर हाऊस हे मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चे मुख्यालय आहे. सध्या ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. कोलकाता आणि नवी दिल्ली व्यतिरिक्त, रुबियो आग्रा आणि जयपूरलाही भेट देणार असून, तिथे ते विविध राजनैतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी सातत्याने मजबूत होत असताना रुबिओ यांचा हा दौरा होत आहे. विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांमधील सहकार्याबाबत चर्चांना अधिक वेग आला आहे. भारत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रुबिओ यांनी अमेरिकेच्या ऊर्जा निर्यात क्षमतेबाबतही भाष्य केले. “भारताला जितकी ऊर्जा आवश्यक आहे, तितकी पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत,” असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी, डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ
आयआरजीसीच्या दहशतवाद्याने ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा रचलेला कट
उकाड्यानंतर पावसाची दमदार एंट्री
भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट
होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताला एक महत्त्वाचा भागीदार संबोधले. तसेच क्वाड गटाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीबाबतही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली. २६ मे रोजी होणाऱ्या क्वाड बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि इंडो-पॅसिफिकमधील सामरिक सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.







