आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांचा विक्रम प्रभावी राहिला आहे आणि त्यांच्या संघात अनेक दिग्गज खेळाडू समाविष्ट आहेत.
भारताकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन प्रमुख खेळाडू आहेत. ज्यांनी भारतीय संघाच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे. कोहलीने तीन वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जिंकला आहे. या स्पर्धेतही तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या खेळी विशेष गाजल्या आहेत.
कोहलीने टी२० विश्वचषक २०१४ आणि २०१६ मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जिंकला होता. तसेच, २०२३ च्या वनडे विश्वचषकात ७६५ धावा करून विक्रमासह हा पुरस्कार पटकावला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो केवळ ४५ धावांनी मागे आहे. ख्रिस गेलला तो मागे टाकू शकतो.
रोहित शर्मादेखील आयसीसी स्पर्धांमध्ये मागे राहिलेला नाही. वनडे विश्वचषकात त्याने सर्वाधिक ७ शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे, ज्यामध्ये २०१९ च्या विश्वचषकात एकाच हंगामात ५ शतके त्यांने ठोकली आहेत. तसेच, टी२० विश्वचषकात रोहितपेक्षा जास्त षटकार (५०) कोणत्याही फलंदाजाने मारलेले नाहीत.
रवींद्र जडेजा २० विकेट्ससह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला होता आणि त्या स्पर्धेत गोल्डन बॉलही मिळवला होता.
भारताच्या प्लेइंग ११ मध्ये मोहम्मद शमी देखील असणार आहे. शमीने २०२३ विश्वचषकात एका हंगामात २४ विकेट्स घेतल्या होत्या. कोणत्याही भारतीय गोलंदाजाने विश्वचषकाच्या एका हंगामात इतक्या विकेट्स घेतलेल्या नाहीत.
न्यूझीलंड संघाकडे केन विल्यमसनसारखा तगडा फलंदाज आहे. तो एकट्याच्या जीवावर सामना फिरवू शकतो. त्याने या स्पर्धेत भारताविरुद्धही शानदार खेळी केली होती. आयसीसीच्या पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा तो प्रमुख खेळाडू होता.
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडची पाकिस्तानमध्ये धमाल, दुबईत मात्र बेहाल
धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशी देणार
फेब्रुवारीत २२० कोटींहून अधिक आधार ऑथेंटिकेशन व्यवहार
या संघाचे नेतृत्व कर्णधार मिशेल सँटनर करत आहे. तो पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत असून आपले काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. हा अनुभवी डावखुरा फिरकीपटू अनेक वेळा संघासाठी निर्णायक ठरला आहे. २०१६ टी२० विश्वचषकात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तो अचूक गोलंदाजी करत आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हा आणखी एक खेळाडू आहे. सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. हेन्रीविरुद्ध भारताच्या काही चांगल्या आठवणी नाहीत. २०१९ च्या गाजलेल्या उपांत्य फेरीत त्याने भारताविरुद्ध ३७ धावा देऊन ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.