विंबलडन 2025 च्या बुधवारच्या सामन्यांनी भारतीय टेनिस चाहत्यांना संमिश्र भावना दिल्या. अनुभवी रोहन बोपन्ना आणि त्यांचे जोडीदार सॅंडर गिल पहिल्याच फेरीत पराभूत होत स्पर्धेबाहेर झाले. दुसरीकडे, युकी भांबरी आणि अमेरिकन रॉबर्ट गैलोवे यांनी आपल्या विजयाची घोडदौड सुरू ठेवत दुसरी फेरी गाठली आहे.
बोपन्ना-गिलची निराशा :
रोहन बोपन्ना आणि सॅंडर गिल यांना तिसऱ्या मानांकित जर्मन जोडी केविन क्राविएट्झ आणि टिम पुएट्झ यांनी अवघ्या 1 तास 4 मिनिटांत 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केले. यंदाच्या वर्षी बोपन्नाचा फॉर्म काहीसा चढउताराचाच राहिला आहे. त्यांनी फ्रेंच ओपनमध्ये एडम पाव्लसेकसोबत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती, तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र युगलात झांग शुआईसोबत क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचले होते.
भांबरी-गैलोवेची चमकदार कामगिरी :
दरम्यान, युकी भांबरी आणि रॉबर्ट गैलोवे यांच्या 16व्या मानांकित जोडीने फ्रान्सच्या मॅन्युएल गुइनार्ड आणि मोनॅकोच्या रोमेन अर्नेडो यांच्यावर 7-6(8), 6-4 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. हा सामना तब्बल 1 तास 49 मिनिटे रंगला.
भांबरीच्या सर्व्हिस आणि गैलोवेच्या व्हॉलीचा योग्य मेळ बसवला गेला. पहिल्या सेटमध्ये दोन सेट पॉइंट्स असूनही त्यांचा उपयोग करता आला नाही, पण टायब्रेकमध्ये संधीचे सोने करत त्यांनी सेट आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये गुइनार्डला दुखापत झाली, तरीही त्यांनी खेळ सुरू ठेवला. मात्र, भांबरी-गैलोवे जोडीने संयम राखत सामना संपवला.
अन्य भारतीयांची संधी :
ऋत्विक बोल्लीपल्ली आणि एन. श्रीराम बालाजी हे दोघेही लवकरच आपापल्या जोडीदारांसोबत आपली मोहीम सुरू करणार आहेत. बोल्लीपल्ली रोमानियाच्या निकोलस बॅरिएंटोससोबत, तर बालाजी मिगुएल रेयेस-वरेला (मेक्सिको)सोबत स्पर्धेत उतरतील.
