कुख्यात गुंड आबू सालेमच्या नावाचा वापर करून एका ६७ वर्षीय निवृत्त लॅब टेक्निशियन वयोवृद्धाची तब्बल ७१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तक्रारदाराचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे खोटे सांगून, डिजिटल अटकेची भीती दाखवून ही मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर सेलने चार अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये गॅंगस्टरच्या नावाचा अशा प्रकारे वापर झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तक्रारदार मुलुंड येथील म्हाडा कॉलनीत राहतात. ते रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते आणि २०१७ मध्ये निवृत्त झाले. २३ सप्टेंबर रोजी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला “पोलीस उपनिरीक्षक संदीपराव” म्हणून सांगत ओळखपत्र पाठवले आणि नाशिक पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
भाजपा कार्यकर्त्यांना आग लावू, निवडणूक आयोगाचे पाय मोडू!
फॅक्टचेकर म्हणवणाऱ्या अल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरला बसला फटका
अल-कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याप्रकरणी इंजिनिअरला अटक
अणुशास्त्रज्ञांशी संबंध, पाकिस्तान प्रवास, दिल्लीत गुप्तहेराला अटक!
त्याचबरोबर आरोपीने त्यांना “आबू सालेमने दहा टक्के कमिशन दिले असून, तुम्ही दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहात” असे सांगून घाबरवले. नंतर बनावट न्यायालयीन कागदपत्रे, गुन्हा दाखल झाल्याचे पत्र आणि मोस्ट वॉण्टेड आरोपींचे फोटो दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागितले.
२३ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान या वयोवृद्धाने वेगवेगळ्या बँक खात्यांत ७१ लाख २४ हजार ५२८ रुपये ट्रान्स्फर केले. परंतु प्रकरण मिटल्याचे सांगूनही पैसे परत मिळाले नाहीत. शेवटी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठगांचा शोध सुरू केला असून, आबू सालेमसारख्या कुख्यात गुंडाच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचे नवे तंत्र समोर आले आहे.







