पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेने हाती घेतला असून, गरज भासल्यास या प्रकरणात राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित आर्याला अटक करण्यापूर्वी त्याचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याने शिक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पातून डावलल्याचा उल्लेख केला होता.
रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलिसांशी केलेल्या चर्चेत, त्याला माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे असल्याचे कळले होते. यानंतर, पोलिसांनी तातडीने केसरकर यांना संपर्क करून आर्याशी त्यांचे बोलणे करून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केसरकर यांनी आर्यासोबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. “मी आता त्या विभागाचा मंत्री नाही आणि मी त्याच्याशी बोलणे उचित नाही,” असे सांगत, त्यांनी पोलिसांना त्याचे बोलणे संबंधित विभागाशी करून देण्यास सुचवले होते.
हे ही वाचा:
भारतीय मानक ब्युरोचे संजय गर्ग महासंचालक
ते ब्लाईंड स्पॉट दूर करतोय भारत…
भारत आणि बहरीन : शतकांपासूनची मैत्री
वडिलांचं नाव लपवण्यात लाज का वाटतेय?
गुरुवारी दुपारी पवईतील महावीर क्लासिक इमारतीतील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्याने १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवले होते. ‘मुख्यमंत्री – आपली शाळा सुंदर शाळा’ या प्रकल्पातून आपल्याला डावलले गेल्यामुळे आर्याने हे पाऊल उचलल्याचे व्हिडिओतून समोर आले होते. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना, अखेर पोलीस चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मृत रोहित आर्याविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल आहे, तर आर्याच्या मृत्यूची अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या तपासासाठी दोन पथके तयार केली असून, मुलांचे, पालकांचे आणि संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
या संपूर्ण घटनेत माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव आल्यामुळे, तपासाचा भाग म्हणून त्यांचा जबाब नोंदवला जाईल, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, केसरकर यांनीही पत्रकारांशी बोलताना पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “तपासात माझी कुठेही गरज भासल्यास मी पोलिसांना सहकार्य करीन,” असे त्यांनी म्हटले आहे.







