सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘मेटा’मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीला सुरुवात झाली असून जगभरातील सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयकेंद्रित नव्या व्यवसाय धोरणासाठी ही मोठी पुनर्रचना सुरू केली आहे. विशेष म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांना पहाटे ४ वाजता ई-मेल पाठवून नोकरीवरील निर्णयाची माहिती देण्यात आल्याने कंपनीत भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीला अधिक वेगवान आणि तंत्रज्ञानकेंद्रित बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यवस्थापनातील अनेक स्तर कमी करून अधिक थेट आणि जलद कार्यपद्धती स्वीकारली जात आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट जाहिरात प्रणाली, ऑटोमेशन आणि प्रगत डिजिटल साधनांवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. त्यामुळे पारंपरिक विभागांतील अनेक पदे अनावश्यक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
जम्मू-कटरा, हावडा-दिल्ली कॉरिडॉरसाठी १,२०० कोटींच्या रेल्वे पायाभूत प्रकल्पांना मंजुरी
मोदींवरच्या ट्विटनतर हेले लिंगचे फॉलोअर्स वाढले
सोनं पुन्हा तेजीत, चांदीत घसरण
कंपनीच्या अंतर्गत मेमोमध्ये मानव संसाधन विभाग प्रमुख जेनेल गेल यांनी कर्मचारी कपातीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियातील विविध कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे माहिती दिली जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मेटा केवळ कर्मचारी कपात करत नाही, तर
कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची विभागीय फेरबदल प्रक्रिया देखील सुरू आहे. सुमारे ७ हजार कर्मचाऱ्यांना नव्या एआय-केंद्रित विभागांमध्ये हलवले जाणार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय जवळपास ६ हजार रिक्त पदे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे १४ हजार रोजगार संधींवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.
नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने भरपाई पॅकेज जाहीर केले आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना १६ आठवड्यांचे मूलभूत वेतन तसेच सेवाकालानुसार अतिरिक्त वेतन देण्यात येणार आहे. मात्र अचानक मिळालेल्या ई-मेलमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण झाला असून भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार कितपत सुरक्षित राहतील, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मेटा २०२६ मध्ये एआय प्रकल्पांसाठी तब्बल १२५ ते १४५ अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे भविष्यातील संपूर्ण लक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवांवर केंद्रित राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एआयमुळे रोजगार व्यवस्थेत मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.







