भारतीय भांडवली बाजारासाठी मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी शेअर बाजार संस्था असलेल्या NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) चा बहुप्रतीक्षित IPO अखेर मार्गी लागला असून सुमारे ₹३० हजार कोटींचा हा मेगा इश्यू बाजारात खळबळ उडवण्यास सज्ज झाला आहे. जवळपास दशकभराच्या प्रतीक्षेनंतर NSE शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या दिशेने पुढे सरसावली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार, दलाल, वित्तीय संस्था आणि बाजार तज्ज्ञांचे लक्ष आता या ऐतिहासिक IPO कडे लागले आहे.
NSE ने IPO साठी आवश्यक कागदपत्रे दाखल केली असून या इश्यूद्वारे सुमारे १४.८९ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण इश्यू ‘ऑफर फॉर सेल’ स्वरूपात असणार आहे. त्यामुळे IPO मधून उभारला जाणारा निधी NSE कडे न जाता विद्यमान भागधारकांना मिळणार आहे. भारतीय स्टेट बँक, टेमासेक, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि इतर मोठे गुंतवणूकदार या माध्यमातून आपला काही हिस्सा विकणार आहेत.
हे ही वाचा:
भारत-पाक सीमा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजवाहतूक पुन्हा सुरू
टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी कायम!
‘दहशतवाद पोसणारा पाकिस्तान आता स्वतःलाच बळी म्हणतो’
सध्या NSE हे भारतातील सर्वात प्रभावशाली वित्तीय व्यासपीठ मानले जाते. रोख बाजारातील सुमारे ९५ टक्के व्यवहार आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील ७५ टक्क्यांहून अधिक व्यवहार NSE वर होतात. एक्स्चेंजवर २,२०० पेक्षा अधिक कंपन्या सूचीबद्ध असून त्यांचे एकत्रित बाजारमूल्य तब्बल ५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यामुळे NSE चे लिस्टिंग केवळ एका कंपनीचा IPO नसून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक मानले जात आहे.
बाजारातील चर्चेनुसार NSE चे मूल्यांकन सुमारे ₹५ लाख कोटींच्या घरात असू शकते. त्यामुळे हा IPO देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, मजबूत नफा, प्रबळ बाजारहिस्सा आणि तांत्रिक क्षमता यामुळे या IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो.
या IPO मुळे अनेक जुन्या गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. भारतीय स्टेट बँकेने वर्षांपूर्वी केलेली काही कोटी रुपयांची गुंतवणूक आता हजारो कोटी रुपयांच्या मूल्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे NSE च्या लिस्टिंगकडे बाजारातील सर्वच घटक आशावादी नजरेने पाहत आहेत.
तथापि, NSE ने आपल्या दस्तऐवजांमध्ये नियामक आव्हाने, सायबर सुरक्षेशी संबंधित धोके, तांत्रिक अडचणी आणि डेरिव्हेटिव्ह व्यवसायावरील अवलंबित्व यासारख्या जोखमींचाही उल्लेख केला आहे. मात्र या आव्हानांनंतरही NSE चा IPO भारतीय भांडवली बाजारासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी एक्स्चेंज आता गुंतवणूकदारांसाठी खुले होणार असल्याने भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.







