तुमची “अॅड टू कार्ट” करण्याची सवयच आज अनेक ब्रँड्सना विक्रमी वेगाने वाढवते आहे. पूर्वी एखाद्या कंपनीला ₹१०० कोटी वार्षिक उलाढालीचा टप्पा गाठण्यासाठी साधारण ११ वर्षे लागत असत. पण आता तोच टप्पा सरासरी फक्त ७ वर्षांत पार होत आहे. म्हणजे तब्बल ४ वर्षांची बचत! ही माहिती बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) यांच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे आणि यामागे सर्वात मोठा हात आहे ई-कॉमर्सचा — म्हणजेच तुमच्या मोबाईलवरून केलेल्या खरेदीचा.
२०१० ते २०१५ दरम्यान सुरू झालेल्या कंपन्यांना ₹१०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी दशकाहून अधिक काळ लागला. मात्र २०१६ नंतर सुरू झालेल्या डिजिटल-केंद्रित कंपन्यांनी हा टप्पा साधारण ६ ते ८ वर्षांत गाठला. वाढीचा वेग जवळपास १.५ ते २ पट वाढल्याचे या अहवालात नमूद आहे. ऑनलाइन-प्रथम कंपन्या सुरुवातीपासूनच इंटरनेटवर विक्री करतात, त्यामुळे मोठे दुकान जाळे उभारण्याचा खर्च व वेळ वाचतो. ग्राहकांचा प्रतिसाद लगेच मिळतो आणि त्यानुसार उत्पादनात जलद बदल करता येतो.
हे ही वाचा:
5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वी मोठा निर्णय; किमतीत ७% ते ३७% कपात
शक्तीपीठ महामार्गात अपप्रचारांचे अडथळे, वास्तव काय?
भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात AI ची एंट्री
पाकिस्तानी समूहांच्या धमक्यांमुळे लंडनमधील १६ वर्षे जुने भारतीय रेस्टॉरंट ‘रंगरेज’ बंद!
२०२१ ते २०२५ या कालावधीत सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल क्षेत्रात ऑनलाइन कंपन्यांनी सुमारे ६० नवीन उत्पादने बाजारात आणली, तर पारंपरिक ऑफलाइन कंपन्यांनी केवळ २० उत्पादने लॉन्च केली. म्हणजेच ऑनलाइन ब्रँड्सची गती जवळपास ३ पट जास्त होती. अन्न आणि किराणा क्षेत्रातही काही डिजिटल ब्रँड्सनी वर्षाला १० ते १५ नवीन उत्पादने सादर केली, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले.
भारतामध्ये आता ८० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. गेल्या ५ वर्षांत ऑनलाइन खरेदीत सातत्याने वाढ झाली आहे. १ ते ३ दिवसांत डिलिव्हरी, आकर्षक सवलती आणि सोपी परतावा सुविधा यामुळे ग्राहकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे झपाट्याने वाढला आहे. तुमचे प्रत्येक “अॅड टू कार्ट” क्लिक एखाद्या नव्या ब्रँडच्या वाढीला हातभार लावत आहे.
सध्या भारताचा ई-कॉमर्स बाजार अंदाजे १०० ते १२५ अब्ज डॉलर दरम्यान आहे. २०३० पर्यंत तो सुमारे ३०० अब्ज डॉलर (सुमारे ₹२४ लाख कोटी) इतका होऊ शकतो. म्हणजे पुढील ५ ते ६ वर्षांत बाजार जवळपास २ ते ३ पट वाढण्याची शक्यता आहे.







