ओडिशा राज्य गुन्हे शाखेच्या विशेष कार्य दलाने (एसटीएफ) रविवारी मोठी कारवाई करत भारतात अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने १० बांगलादेशी नागरिकांना भुवनेश्वर रेल्वे स्थानकावरून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याबद्दल अटक केली. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
माहितीनुसार, बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसामच्या धुबुरी जिल्ह्याजवळील एका एजंटद्वारे या लोकांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आणि भुवनेश्वरमध्ये राहण्यासाठी आले. सध्या त्यांच्याबद्दल अधिकची माहिती मिळवली जात असून भुवनेश्वरला येण्याच्या हेतूचीही चौकशी केली जात आहे. एसटीएफचे डीआयजी पिनाक मिश्रा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
२० ते ४० वयोगटातील घुसखोर बांगलादेशच्या मैमनसिंग, बागेरहाट, प्रिसपूर आणि ढाका भागातील होते. गुप्त माहितीच्या आधारे एसटीएफ पथकाने प्रवाशांच्या तपासणीदरम्यान रेल्वे स्थानकावर अचानक तपासणी केली. चौकशीत संशयितांना वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतेही वैध प्रवास कागदपत्रे सादर करता आली नाहीत. तसेच या गटाने त्यांच्या बेकायदेशीर प्रवेशास मदत करणाऱ्या एजंटला मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून सात मोबाईल फोन आणि काही बांगलादेशी, भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा..
कठुआ घटनेची अमित शहांनी घेतली माहिती
हंपी बलात्कार प्रकरणात तिसऱ्या नराधमाला चेन्नईहून ठोकल्या बेड्या
४८ तासांत मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमधून बंडखोर गटांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक
शाजापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांच्या कौशल्याचे प्रदर्शन
प्राथमिक तपासानुसार, हे लोक रोजगाराच्या शोधात होते आणि सध्या एसटीएफने परदेशी कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच एसटीएफ अधिकारी अशा बेकायदेशीर सीमा ओलांडण्यास मदत करणाऱ्या तस्करी करणाऱ्यांच्या व्यापक नेटवर्कचा तपास करत आहेत. अटक केलेल्या व्यक्तींनी उल्लेख केलेल्या एजंटची ओळख पटवणे आणि इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्यावर पोलिसांचे लक्ष आहे. ओडिशामध्ये ३,७४० बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत आहेत आणि त्यांना हद्दपार करण्याचा विचार सुरू आहे, असे ओडिशा सरकारचे म्हणणे आहे.