कर्नाटकमधील हंपी येथे एक २७ वर्षीय इस्रायली पर्यटक आणि २९ वर्षीय होमस्टे मालकीण या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याशिवाय या महिलांसोबत असलेल्या तीन पुरुष साथीदारांवरही नराधमांनी हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु होता. अखेर या तिसऱ्या नराधमालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कर्नाटक पोलिसांनी हंपी बलात्कार प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनेपासून तो फरार होता आणि पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. या आरोपीचे नाव सरनबसव (वय २७ वर्षे) असे आहे जो सुतारकाम करत होता. त्याला गंगावती ग्रामीण पोलिसांनी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून अटक केली आणि कर्नाटकला आणले आहे.
एएनआयशी बोलताना कोप्पलचे पोलिस अधीक्षक राम अरसिद्दी म्हणाले की, जर गरज पडली तर आरोपीला पोलिस कोठडीत घेतले जाईल. “आम्ही ही घटना खूप गांभीर्याने घेतली असून पथके तयार केली आहेत. आम्ही घटनास्थळी भेट दिली आणि तांत्रिक मदतीवरून, दोन जणांना अटक केली होती. आणखी एक व्यक्ती, सरनबसव (२७), जो फरार होता, त्याला चेन्नई, तामिळनाडू येथून अटक करण्यात आली आहे. आम्ही त्याला येथे आणले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. गरज पडल्यास, आम्ही त्याला पोलिस कोठडीत देखील घेऊ,” असे अरसिद्दी यांनी एएनआयला सांगितले.
तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत आणि परिसरात गस्त वाढवली आहे. ते म्हणाले की, “आम्ही या भागात गस्त वाढवली असून भागांची तपासणी देखील केली आहे. रात्रीच्या वेळी सर्व रिसॉर्ट्स तपासत आहोत. येत्या काही दिवसांत, आम्ही अचानक भेटी देत राहू, जर कोणताही अवैध पदार्थ किंवा कोणतेही उल्लंघन आढळले तर आम्ही गुन्हा नोंदवू.”
हे ही वाचा..
४८ तासांत मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमधून बंडखोर गटांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक
शाजापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांच्या कौशल्याचे प्रदर्शन
वानुअतु देशाकडून ललित मोदीला दणका; पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड
प्रकरण काय?
हंपी हे कर्नाटकातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असून देश- विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास, दोन महिला आणि तीन पुरुष, हे हंपी आणि जवळपासच्या इतर ठिकाणी गप्पा मारत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. यावेळी मोटारसायकलवरून तीन तरुण त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे पेट्रोल मागितले. तसेच पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना २० रुपये देऊ केले असता बाईकवरील पुरुषांनी १०० रुपये मागितले. यातून वाद झाला आणि हाणामारीही झाली. हल्लेखोरांनी पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलले. त्यानंतर, ते पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, तीनपैकी दोघांनी एका तरुणीवर आणि इस्रायली पर्यटकावर बलात्कार केला.