आयपीएल माजी अध्यक्ष ललित मोदी याला वानुअतु देशाकडून मोठा दणका मिळाला आहे. वानुअतु देशाच्या पंतप्रधानांनी ललित मोदी याचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ललित मोदी याच्याकडे वानुअतुची नागरिकता असून त्याने अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्याचा अर्ज केला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, ललित मोदी याने लंडनमधील भारतीय उच्चायोगात आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे वानुअतुची नागरिकता असल्याचेही समोर आले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्याच्या विरोधात आवश्यक कारवाई केली जाईल, असे जायसवाल यांनी स्पष्ट केले होते.
ललित मोदी याने त्याचा भारतीय पासपोर्ट सोडून देण्याचा निर्णय घेत वानुअतु या छोट्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. पण आता तिकडच्या पंतप्रधानांनीचं ललित मोदीला धक्का दिला आहे. वानुअतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदी याचा पासपोर्ट तात्काळ रद्द करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदी यांचा वानुअतु पासपोर्ट तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या २४ तासांत, मला माहिती मिळाली की इंटरपोलने न्यायालयीन पुराव्याअभावी भारत सरकारने ललित मोदीबाबत पाठवलेली अलर्ट नोटीस दोनदा नाकारली आहे. अशा परिस्थितीत, याचिकाकर्त्यांनी केवळ वैध कारणांसाठीच नागरिकत्व घ्यावे.
ललित मोदी याने ७ मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला पासपोर्ट जमा केला होता. नंतर परराष्ट्र मंत्रालयाने ललित मोदी याने त्याचा पासपोर्ट सादर केल्याची पुष्टी केली. आयपीएल सुरू करणारा ललित मोदी १५ वर्षांपूर्वी भारतातून ब्रिटनला पळून गेला होता. भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी सातत्याने करत आहे आणि कायदेशीर लढाई देखील सुरू आहे परंतु आता त्याने भारतीय नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा..
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड
मध्य प्रदेश: महू येथील जामा मशीद परिसरातून चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानिमित्त काढलेल्या रॅलीवर दगडफेक
पुण्यात काँग्रेसला खिंडार; माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पक्षाला राम राम
सेनापतीच तलवार म्यान करत असेल तर..
२००९ मध्ये आयपीएलच्या प्रसारण हक्कांशी संबंधित ४२५ कोटी रुपयांच्या करारात अनियमितता केल्याचा आरोप ललित मोदीवर आहे. मे २०१० मध्ये तो लंडनला पळून गेला आणि त्यानंतर बीसीसीआयने त्याला बडतर्फ केले. ललित मोदी याच्यावर संघांच्या लिलावात फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. चौकशीत त्याला दोषी ठरवण्यात आले असून २०१५ मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपांमुळे त्याच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते.
वानुअतु हा दक्षिणी प्रशांत महासागरातील एक लहानसा द्वीपीय देश असून ज्याची लोकसंख्या जवळपास तीन लाख आहे. वानुअतुला १९८० मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले होते. हा देश गुंतवणुकीच्या कार्यक्रमांतर्गत जागतिक नागरिकत्व प्रदान करतो. माहितीनुसार, वानुअतुतील नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान १.५५ लाख डॉलर इतका खर्च करावा लागतो.