महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला दणका बसला असून पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. रविंद्र धंगेकर हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रविंद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस सोडताना दुःख होत असल्याची भावना रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं की, “पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. काँग्रेस पक्षावर कसलीच नाराजी नसून कोणत्याही नेत्यांवरही नाराजी नाही. काँग्रेसने भरपूर दिलं. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत.” पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना भेटलो होतो. कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांची आज भेट घेणार असून त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेलं नसून सत्तेशिवाय कामं होतं नाही असं जनतेचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंसोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली आहे. गेल्या ३५ वर्षात मला सत्तेचा लाभ मिळाला नाही. कार्यकर्त्यांची आता सत्तेसह जाण्याची भावना आहे, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने केला झेल सोडण्याचा विक्रम
रोहित सलग बारा वेळा टॉस हरला; ब्रायन लाराशी बरोबरी!
इंडियन वेल्स: ५ वेळा चॅम्पियन जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत
रविंद्र धंगेकर असेही म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं नाही, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी अनेकदा फोन करून सोबत काम करण्याची ऑफर दिली. मित्रत्त्वाचं नातं असल्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले.”