भारतीय क्रिकेट संघाची तब्बल १२ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी मात करत दुबईमध्ये झालेला अंतिम सामना जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ठेवलेले २५२ धावांचे आव्हान पार करताना भारताने ६ बाद २५४ धावा केल्या. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ७६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८, अक्षर पटेल २९, के.एल. राहुल ३४, हार्दिक पंड्या १८ यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने ही लढत जिंकली.
त्याआधी, रोहित शर्मा नाणेफेक हरला आणि न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरण्याची रोहितची मालिका इथेही कायम राहिली पण सामना त्याने जिंकून दाखवला. प्रथम फलंदाजी करताना किवींनी ७ बाद २५१ धावा केल्या. त्यात डॅरिल मिचेलच्या ६३ आणि मायकेल ब्रेसवेलच्या ५३ धावांचा समावेश होता. ही धावसंख्या भारताने ४९ षटकांत पार केली. शुभमन गिल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला होता. पण गिलला सॅँटनरने बाद केले आणि धावसंख्येत एका धावेची भार घातल्यावर विराट अवघी एक धाव काढून परतला. पाठोपाठ १२२ धावा झालेल्या असताना रोहितही बाद झाला. रोहितने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. त्यामुळे भारतापुढे मोठे संकट उभे राहिले पण श्रेयस आणि अक्षर यांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करून भारताला सावरले.
हे ही वाचा:
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने केला झेल सोडण्याचा विक्रम
आयुष्मान कार्डमुळे वृद्धाला मिळाले मोफत उपचार; पंतप्रधान मोदींना धन्यवाद
रोहित सलग बारा वेळा टॉस हरला; ब्रायन लाराशी बरोबरी!
मुंबईतील नागपाड्यात पाण्याची टाकी साफ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू!
श्रेयसने प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. पण सँटनरने त्याचा अडसर दूर केला. रचीन रवींद्रने सुंदर झेल पकडत श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षर पटेलही पाठोपाठ बाद झाला. त्यामुळे भारतीय संघ दोलायमान अवस्थेत होता. मात्र हार्दिक पंड्या आणि राहुलने ३८ धावांची भर घालून भारताला विजयासमीप आणले. दोघांनी संयमी फलंदाजी करत पडझड होणार नाही याची काळजी घेतली. हार्दिक बाद झाल्यावर रवींद्र जाडेजा मैदानात उतरला आणि त्याने दोन दोन धावा काढण्याचा सपाटा लावत निर्धारित धावांचे लक्ष्य कमी केले. शेवटचा चौकार लगावत भारताच्या विजयावर जाडेजानेच शिक्कामोर्तब केले.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला रोहित शर्मा तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला न्यूझीलंडच्या रचीन रवींद्रला त्याने स्पर्धेत २६३ धावा आणि ३ विकेट्स अशी कामगिरी केली.
भारताचे तिसरे चॅम्पियन्स विजेतेपद
याआधी भारताने २००२ आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी विजेतेपदांची बरोबरी केली आहे. दोघांनीही तीनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर आठ महिन्यात त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याद्वारे पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटमध्ये भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
हा विजय आयसीसी क्रिकेट स्पर्धांमधील भारताचा सातवा विजय आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताने जिंकलेले हे आयसीसीचे सातवे विजेतेपद आहे. भारताने आता दोन वनडे वर्ल्डकप, तीन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन टी-२० वर्ल्डकप जिंकले आहेत. महेंद्रसिंग धोनीनंतर एकापेक्षा अधिक आयसीसी स्पर्धा जिंकणारा रोहित हा दुसरा कर्णधार ठरला आहे.