बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना, बेतिया जिल्ह्यातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बेतियाचे भाजप खासदार संजय जयस्वाल यांच्याकडून अज्ञात गुन्हेगारांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. खासदार संजय जयस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गुन्हेगारांनी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून दोन वेळा फोन करून जयस्वाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी धमकी दिली की, जर खंडणी दिली नाही, तर खासदारांचे मुलगा डॉ. शिवम जयस्वाल यांना जीवे मारले जाईल.
या प्रकरणी संजय जयस्वाल यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, यासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. पोलिस विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींचा मागोवा घेत आहेत.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला आहे. महाआघाडीचे नेते सत्तेवर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर एनडीएचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोमाने प्रचार करत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत, पहिला टप्पा: ६ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा: ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यादिवशी बिहारचे पुढील सरकार कोणाचे असेल हे निश्चित होणार आहे.







