छत्तीसगढ दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने काँग्रेस नेते कवासी लखमा यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे ईडीने काँग्रेसचे सुकमा जिल्हा मुख्यालयही जप्त केले आहे. ही इमारत छत्तीसगढ प्रदेश काँग्रेस समितीच्या नावावर आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची इमारत घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाने बांधली गेली का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईडीने कवासी लखमा यांच्या मुलीच्या अनेक मालमत्ताही जप्त केल्या आहेत. दरम्यान, मागील काँग्रेस सरकारच्या काळात २१०० कोटी रुपयांचा कथित दारू घोटाळा झाला होता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ईडीच्या कारवाईवर कॉंग्रेसने भाजपावर टीका केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये कवासी लखमा यांच्या नावावर रायपूरमधील एक निवासी घर आणि त्यांचा मुलगा हरीश लखमा यांच्या नावावर सुकमामधील एक घर समाविष्ट आहे. या मालमत्तांची किंमत ६.१५ कोटी रुपये आहे. रायपूरमधील काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले की, ईडीची कारवाई भाजपच्या राजकीय कटाचा भाग आहे. सुकमा येथील कार्यालयाच्या बांधकामासाठी वापरल्या गेलेल्या “प्रत्येक” पैशाची नोंद काँग्रेस पक्ष सादर करेल.
७२ वर्षीय कवासी लखमा हे कोंटा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिले आहेत आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री राहिले आहेत. त्यांचा मुलगा हरीश लखमा हे सुकमा येथील पंचायत अध्यक्ष आहेत. दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये एजन्सीने रायपूर, सुकमा आणि धमतरी जिल्ह्यातील लखमा यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. तर ईडीने जानेवारीमध्ये त्यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
हे ही वाचा :
पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी
“विश्वासाधारित शासना”मुळे अर्थव्यवस्था शिखर गाठू शकते
कोण लोकशाहीत ‘राजा’ बनण्याचा प्रयत्न करतोय
विमान अपघात : चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
“कवासी लखमा यांना दारू घोटाळ्यातून दरमहा २ कोटी रुपये मिळत होते आणि अशाप्रकारे त्यांनी ३६ महिन्यांत ७२ कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमावले. तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत ज्यात असे दिसून आले आहे की कवासी लखमा यांनी या मालमत्तांच्या बांधकामात रोख रक्कम वापरली होती,” असे ईडीने म्हटले आहे.
काँग्रेस भवनाच्या बांधकामात ६८ लाख रुपयांची रोकड वापरण्यात आली, हरीश लखमा यांच्या घराच्या बांधकामात १.४० कोटी रुपये वापरण्यात आले आणि रायपूरमधील त्यांच्या (कवासी लखमा) घराच्या बांधकामात २.२४ कोटी रुपये वापरण्यात आले, असा आरोप ईडीने केला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारातून मिळवलेले पैसे सुकमा येथील काँग्रेस कार्यालयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.
