ओडिशामधील नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत, सुरक्षा दलांनी कोरापुट जिल्ह्यातील घनदाट पेटागुडा जंगलातून कुख्यात नक्षलवादी नेता कुंजाम हिडमा याला अटक केली आहे. गोळीबाराच्या चकमकीनंतर करण्यात आलेली ही अटक प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेला मोठा धक्का मानली जात आहे.
कोरापुटचे पोलिस अधीक्षक रोहित वर्मा यांनी सांगितले की, २८ मेच्या रात्री उशिरा विशिष्ट गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. बायपारिगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बायपासगुडा परिसरात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यावर, जिल्हा स्वयंसेवी दलाच्या (DVF) संयुक्त पथकाने ही मोहिम राबवली. या पथकाचे नेतृत्व जयपूर SDPO पार्थ कश्यप यांनी केले.
“गुरुवारी पहाटे आमच्या पथकाने टेकडीवर तळ ठोकलेल्या नक्षलवाद्यांना पाहिले. सुरक्षा दलांनी पुढे जाताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. आमच्या जवानांनी आत्मसंरक्षणार्थ नियंत्रित गोळीबार केला,” असे एसपी वर्मा यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अंधारे रातो मे सुनसान राहो पर !
१७ वर्षांची तहान… शेवटी RCB फाइनलमध्ये!
सनातन धर्मात महिलांना आदर मिळतो, म्हणून निदा खानने सोडला इस्लाम!
राखेच्या ढिगाऱ्यात ट्रम्प काय शोधतायत ?
सर्च ऑपरेशनदरम्यान, एका नक्षलवाद्याला झाडाझुडपांमध्ये लपलेले आढळून आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची ओळख कुंजाम हिडमा अशी पटली असून तो छत्तीसगडमधील बीजेपूरचा रहिवासी आणि सीपीआय (माओवादी) च्या क्षेत्रीय समितीचा सदस्य (ACM) आहे.
शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त
अटकेच्या ठिकाणाहून पोलिसांनी एक एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. यावरून हिडमा मोठ्या कारवायीची तयारी करत होता, असे संकेत मिळतात.
हिडमा ओडिशातील किमान सात गंभीर हिंसक घटनांमध्ये सहभागी असल्याचे समजते आणि तो आंध्र प्रदेश व छत्तीसगडमध्येही सक्रिय होता. अनेक देशविरोधी आणि सरकारविरोधी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. ही अटक म्हणजे ओडिशा, आंध्र आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर सक्रिय असलेल्या माओवादी नेटवर्कसाठी मोठा आघात आहे, असे मानले जात आहे.
पोलीस त्याच्या सहकाऱ्यांची माहिती, शस्त्र साठवणूक आणि लपण्याच्या ठिकाणांबाबत चौकशी करत आहेत. “ही अटक नक्षलवाद्यांचे बळ कमकुवत करण्यासाठी निर्णायक ठरेल,” असे पोलिस अधीक्षक वर्मा यांनी सांगितले.
