मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित ताज हॉटेलला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने रविवारी मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. मात्र, पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) केलेल्या सखोल तपासणीनंतर हॉटेल परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळून आले नाही. प्राथमिक तपासात ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, “दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” अशी माहिती दिली. ही माहिती तातडीने मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
हे ही वाचा:
सूरांचा अमर स्वर हरपला; दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन
“१५ जुलै रोजी पाकिस्तान विधानसभेपासून स्वातंत्र्य घोषित करू”
जोकोविचचे २५व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न पुन्हा भंग
४,००० मृत्यू अन् आर्थिक संकट; व्हेनेझुएलावर दुहेरी आघात!
धमकीची माहिती मिळताच कुलाबा पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तात्काळ ताज हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलचा मुख्य प्रवेशद्वार, लॉबी, स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, पार्किंग परिसर तसेच इतर संवेदनशील भागांची कसून तपासणी करण्यात आली.
अनेक तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर हॉटेलमध्ये कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासादरम्यान धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाची ओळख पटली असून तुर्भे पोलिसांच्या मदतीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







