उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात ‘भूरे’ नावाचा एक लाख रुपयांचा इनामी गुन्हेगार पोलिस एन्काउंटरमध्ये ठार झाला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घेराव घालून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गोळीबार सुरू केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
डीजीपी प्रशांत कुमार यांच्या कार्यालयानुसार, ही कारवाई उमरीबेगमगंज पोलीस ठाणे, खोडारे पोलीस ठाणे आणि एसओजी (स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप) यांच्या संयुक्त पथकाने केली. आरोपी सोनू पासी उर्फ भूरेकडून एक विनानंबर प्लेटची मोटरसायकल, एक बेकायदेशीर .३२ बोअर पिस्तूल, आणि एक बेकायदेशीर ३१५ बोअर देशी कट्टा व काडतुसे जप्त करण्यात आली.
चोरी आणि गोळीबार प्रकरण
२४ एप्रिलच्या रात्री उमरीबेगमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवीदीन नावाच्या व्यक्तीच्या घरात चोरी झाली होती. चोरी करत असताना घरातील एक व्यक्ती जागा झाला आणि चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी देवीदीन यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या घटनेचा गंभीरपणे विचार करून, पोलिस अधीक्षक (पश्चिमी) यांच्या देखरेखीखाली तीन पथकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये एसओजी आणि सर्व्हेलन्स युनिटचा समावेश होता.
८ मे रोजी तीन आरोपी – बृजेश उर्फ छोटू पासी, पल्लू पासी आणि नानमुन्ना लोध यांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी सोनू पासी उर्फ भूरे फरार होता. त्याच्या अटकेसाठी एडीजी गोरखपूर विभागाकडून १ लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘राहुल गांधींचे प्रश्न हे बेजबाबदारपणाचे!’
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
शीख गुरूंबद्दलच्या वादग्रस्त क्लिपमुळे ध्रुव राठीने युट्युबवरून व्हिडीओ हटवला
छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी
असे झाले एन्काऊंटर
१९ मेच्या रात्री, संयुक्त पोलिस पथक भूरेला अटक करण्यासाठी सलोनी मोहम्मदपूर बंधा भागात सापळा रचला होता. भूरे मोटरसायकलवरून येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला घेरले. पण भूरेने स्वतःला अडकलेले पाहून पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये उमरीबेगमगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांचा जीव बुलेटप्रूफ जॅकेटमुळे वाचला.
पोलिसांनी आत्मसंरक्षणात प्रत्युत्तर देत गोळीबार केला, ज्यात भूरे जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.







