सोमवारी, १२ मे २०२५ रोजी मस्कतमधील इंडियन स्कूल बौशर (Muscat) येथील इयत्ता पाचवीत शिकणारे विवान भाटिया (९ वर्षे) आणि जान्हवी भाटिया (१० वर्षे) यांनी एक अद्वितीय कामगिरी बजावली. त्यांनी सायांगबोचेचा एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट (३८८० मी), नांगकर्त्सांग पीक (५०८३ मी) सर करत एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३८४ मी) गाठले. विशेष म्हणजे जान्हवीचा वाढदिवस बेसकॅम्पला साजरा करण्याचे उद्दिष्ट या कुटुंबाने बाळगले होते, ते त्यांनी पूर्णही केले.
या अद्भुत प्रवासाची सुरुवात झाली ती आई चारू भाटिया-पोतदार यांच्या गिरिभ्रमणाच्या आवडीतून. मस्कतमधील त्यांच्या स्थानिक ट्रेक्समधील अनुभव आणि सोशल मीडियावरील शेअरिंगमुळे, दोघा मुलांमध्ये गिरिभ्रमणाची उत्सुकता निर्माण झाली आणि लवकरच ते त्यांच्या आईचे सोबती बनले.
या हिमालयीन ट्रेकची तयारी जानेवारी २०२५ पासून सुरू झाली होती. सुरुवातीला चारू एकटीच मुलांसह जाणार होत्या, पण त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पती ऋतेश भाटिया यांनीही सोबत जायचे ठरवले. अखेर संपूर्ण कुटुंब २ मे २०२५ रोजी भारतातून निघाले.
हे ही वाचा:
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी
त्रिकोणाचा चौथा कोन: राहुल गांधी
पाक हेर तारीफने सिरसात एअरबेसचे फोटो काढले…याच तळाला पाकने आता लक्ष्य केलं
लुक्ला विमानतळापासून सुरुवात
ट्रेकची औपचारिक सुरुवात ४ मे २०२५ रोजी लुक्ला विमानतळावरून झाली, जो जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक मानला जातो. दररोज ८–१० तासांची चढाई, १०–११ किमी अंतर, आणि ६०० ते ८०० मीटर उंची वाढ – असा तब्बल १३० किमीचा खडतर प्रवास त्यांनी पूर्ण केला. अन्न आणि निवासाची सुविधा अत्यंत साधी असतानाही, भाटिया कुटुंबाने प्रत्येक दिवसाला सकारात्मक दृष्टीने सामोरे जात हे आव्हान स्वीकारले.
शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी
चारू यांचा विश्वास त्यांच्या मुलांवर होता कारण दोघेही राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांमध्ये ओडिशामध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करत होते. टेक्निकल क्लायम्बिंग नसले तरी उंची, हवामानाचा तातडीचा बदल आणि कठीण भूगोल यामुळे ट्रेक खूपच कठीण होता. सुरुवातीला हिरव्या बांबू आणि झाडांनी व्यापलेली वने, रोमांचक झुलता पूल आणि त्यानंतर उंचावर गेल्यावर खडकाळ रस्ते अशा बदलत्या भूभागात त्यांनी वाटचाल केली. गोरकशेपच्या पलीकडे हिमनद्या आणि मरीनचा प्रदेश, जो तितकाच सुंदर आणि घातक होता.
एव्हरेस्ट बेस कॅम्पचा क्षण आणि वाढदिवस
एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यावर सगळे कुटुंब आनंदी होते. जान्हवीसाठी तर हा क्षण अधिक खास होता, कारण तिने तिचा १०वा वाढदिवस एव्हरेस्ट बेस कॅम्पला साजरा केला. हा असा एक अनुभव आहे, जो तिच्या आयुष्यभर स्मरणात राहील. चारू भाटिया यांच्या मते, या ट्रेकचा मुख्य उद्देश मुलांना त्यांच्या अंतर्मनातील शक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करणे आणि प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी शिस्त, मेहनत याशिवाय पर्याय नाही, हे शिकवणे होते.
