ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक समीकरणांमध्ये सुक्ष्म बदल दिसू लागले आहेत. काही जुन्या समीकरणांचे आशय बदलले आहेत. काही नवी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. भारताच्या सामरीक यशाने युरोप-अमेरिकेलाही
फार आनंद झालाय, अशातला भाग नाही. पाकिस्तान, चीन, बांगलादेश हा खतरनाक त्रिकोण अधिक मजबूत झालेला आहे. भारतातील पंचम स्तंभीय या त्रिकोणाचा चौथा कोन बनले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान-चीनला
बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. त्यांना ते शक्य झालेले नाही. ही माहिती उघड व्हावी म्हणून राहुल गांधी यांच्यासारखे नेते कामाला लागलेत की काय, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवले. हे सामर्थ्य आपल्या युद्धकौशल्याचे होते, तंत्रज्ञान सामर्थ्याचे होते, आपल्या मारक क्षमतेचे होते. पाकिस्तानला मार पडला, चिनी युद्ध साहित्य म्हणजे केवळ भंगार असते याची जगाला प्रचिती आली. त्यामुळे पाकिस्तानसोबत चीनला दणका बसला आहे. जागतिक शस्त्रास्त्र बाजारात चीनचे तोंड काळे झाले आहे. चिनी युद्ध साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. एविक चेंगडू ही कंपनी जे-१० लढाऊ विमानांची निर्मिती करते, या कंपनीला मोठा फटका बसला आहे.
चरफडलेल्या चीनने भारताला धडा शिकवण्यासाठी बांगलादेशला चिथावणी द्यायला सुरूवात केलेली आहे. चिंचोळ्या भूभागामुळे ज्याला चिकन नेक म्हणून ओळखले जाते अशा सिलिगुडी कोरीडोअरवर चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. ईशान्य भारताला जोडणाऱ्या या चिंचोळ्या पट्ट्यापासून केवळ १२.५ किमी अंतरावर बांगलादेशातील लालमुनीर हाट हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हवाई तळ सक्रीय करण्यासाठी चीनने बांगलादेशी पिट्ठू मोहमद युनूसला कामाला लावलेले आहे. एका बाजूला चीन, पाकिस्तान, बांगलादेशच्या कारवायांना जोर आलेला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अशी काही माहिती जाहीर करण्याची मागणी करतायत जी मिळवण्यासाठी पाकिस्तान प्रचंड उत्सुक आहे.
भारत-पाक संघर्षाच्या दरम्यान तिन्ही सेनादलांच्या डीजीएमओंची संयुक्त पत्रकार परिषद होत असे. भारताची तीन राफेल विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने अगदी जोरात केला होता. याबाबत या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमचे सगळे वैमानिक सुरक्षित आहेत, अशी माहिती एअर मार्शल ए.के.भारती यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना उघड केली होती. भारताची विमाने पाडल्याचा जो दावा पाकिस्तान करीत होता, त्यामागील सत्यही पुढे बाहेर आले. पाकसाठी हा चकवा होता. भारतीय वायुदलाचे हे दृष्यम् होते. पाकिस्तानकडे असलेल्या चीन बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालीचे लक्ष्य
भरकटवण्यासाठी डमी विमाने पाकिस्तानवर पाठवण्यात आली होती. त्यानंतर क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला होता.
ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांचे एक विधान आले. दहशतवादी तळावर क्षेपणास्त्रांचा हल्ला करताना तशी पूर्व कल्पना पाकिस्तानला देण्यात आली होती. हा हल्ला नागरी वस्त्या किंवा लष्करी आस्थापनांवर नसून फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी आहे, हे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. आमचा लढा फक्त दहशतवादाशी आहे हा संदेश भारताला सगळ्या जगाला द्यायचा होता. या विधानाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी डॉ.जयशंकर यांच्यावर तोफ डागलेली आहे. पाकिस्तानवर हल्ला होणार हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
आपली किती लढाऊ विमाने कामी आली? त्याला जबाबदार कोण? असे सवाल, राहुल गांधी विचारत आहेत. काल त्यांनी हा सवाल केला होता. आजही त्यांनी त्याचा पुनरोच्चार केलेला आहे.
भारताने केलेला हल्ला हा केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यापुरता मर्यादित आहे. हे लक्ष्य गाठण्यापलिकडे आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, ही भूमिका भारताने सुरूवातीपासून मांडली. सेनाधिकाऱ्यांच्या प्रत्येक पत्रकार परीषदेत याचा
आपण पुनरोच्चार केलेला आहे. जागतिक स्तरावर भारताच्या हेतूबाबत विश्वास वाढवणारी ही भूमिका होती. जगातील देश या संघर्षात भारताच्या बाजूने राहिले त्याचे कारणही ही सुस्पष्टता आहे. आम्ही दहशतवादाच्या विरोधात लढतो
आहोत हे भारताला जगाला सांगायचे होते. ते जगाला पटले होते. जयशंकर यांनी जो इशारा दिला तो थोड्या वेगळ्या शब्दात पहेलगाम हल्ल्यानंतर लगेचच मोदींनीही दिला होता. असाच इशारा पुलवामाच्या आधीही देण्यात आला होता.
जेव्हा संघर्ष सुरू होतो, तेव्हा एक बाजू विजयी होते, दुसरी पराभूत. परंतु विजयी झालेल्याचे अजिबात नुकसान झाले नाही, असे कधीही होत नाही. दुसऱ्या महायुद्धात सर्वात कमी झळ बसली ती अमेरीकेला, परंतु जपानने अमेरीकेचा
पर्ल हार्बरचा तळ उद्ध्वस्त केला होताच की.
मुळात एस.जयशंकर यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय मुत्सद्यासमोर उभे राहण्या इतपत राहुल गांधी यांची लायकी नाही. प्रश्न विचारणे ही खूप दूरची गोष्ट. परंतु देशात लोकशाही आहे, अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकतो. काहीही विचारू शकतो. अलिकडेच विधानसभा निवडणुकांमध्ये पडलेले मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे. विनंतीवजा सुचना केल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनाही तो अधिकार आहे. त्याचा वापर करून ते वेळोवेळी वाट्टेल ते बोलत असतात. जयशंकर यांना हे अधिकार कोणी दिले, हा प्रश्न तर अगदीच फाजील आहे. ते देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत. इतर देशांशी ते बोलणार नाहीत तर कोण बोलणार? सुप्रिया श्रीनेत की पवन खेरा? चार चौघांना कळतील अशा गोष्टीही राहुल गांधी यांना कळत नाहीत, ही त्यांची नाही, काँग्रेसची समस्या आहे.
हे ही वाचा:
“मयंक यादव – भारताचा वेगवान हिरा… पण दुखापतीनं झाकोळला!”
“धुरंधर शमीची भेट बुलंद योगींशी – अफवांना क्लीन बोल्ड!”
मशीद समितीला दणका! संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणने सरकारच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण नाकारले!
आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे शत्रूला कळू द्यायचे नाहीत हा रणनीतीचा अगदीच सामान्य धडा आहे. कारण एका बाजूचे कमकुवत दुवे दुसऱ्या बाजूचे बलस्थान बनू शकतात. चीनची हवेतून जमीनीवर मारा करणारी पी- १५ क्षेपणास्त्र हरीयाणामध्ये सापडली. ही क्षेपणास्त्रे लक्ष्यावर आदळली नाहीत, तरी आपोआप स्फोट होऊन ती नष्ट होती, अशी यंत्रणा त्यात असते. पी१५ मात्र अगदी जशीच्या तशी सापडली. या क्षेपणास्त्रांचा खूप बोलबाला होता. त्यांची अचूकता, मारक क्षमता वगैरे वगैरे. परंतु प्रत्यक्षात या केवळ बाता निघाल्या. एक पी १५ हरीयाणाच्या वाळूमध्ये सापडले. त्याचा स्फोटही झाला नव्हता. हे क्षेपणास्त्र भारताच्या हाती आल्यानंतर त्याचे इंजिन, वॉरहेड, गाईडन्स सिस्टीम नेमकी कशी आहेत, त्याची सगळी माहिती आता भारताच्या हाती येणार आहे.
तुर्कीये बनावटीच्या अनेक ड्रोन्सबाबतही हेच झालेले आहे. ही माहिती म्हणजे शत्रूची मर्मस्थाने आहेत. जशी त्यांची आहेत, तशी काही आपलीही आहेत. ही मर्मस्थाने शत्रूला कळू नयेत म्हणून सेनादलांच्या पत्रकार परिषदांमध्ये अत्यंत मोजून मापून शब्द वापरले गेले. किती लढाऊ विमाने कोसळली, या प्रश्नाचे उत्तर देताना, नुकसान हा लढाईचा अविभाज्य भाग आहे, असे उत्तर एअर मार्शल ए.के.भारती यांनी दिले होते. भारताने पाकिस्तानची जी विमाने नष्ट केली, त्यांची माहितीही त्यांनी उघड केली नाही. ए.के.भारती जे काही म्हणाले, ते त्यांना सांगण्यात आले नव्हते. हा सामान्य ज्ञानाचा भाग आहे. संरक्षण सज्जतेबाबतची माहिती अत्यंत संवेदनशील असते हे लक्षात ठेवून सेनाधिकाऱ्यांनी अत्यंत संयमित भाषेचा प्रयोग केलेला आहे. जे त्यांनी उघड करून सांगितले नाही, ते उघड व्हावे अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, परंतु त्यांची वर्तणूक देशविरोधी असल्यासारखी असते. राफेलच्या बाबतीत त्यांनी हेच केले होते. राफेलची किंमत इतकी का वाढली, हा प्रश्न ते काही काळापूर्वी सातत्याने उपस्थित करायचे. ही किंमत नेमक्या कोणत्या एक्सेसरीजमुळे वाढली आहे, ही माहिती उघड व्हावी असा त्यावेळी त्यांचा अंतस्थ हेतू होता, अशी उघड चर्चा त्यावेळी झाली होती. राहुल गांधी केवळ केंद्र सरकारला लक्ष्य करीत नसून लष्करावरही तीर चालवतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
