अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभलमधील जामा मशिदीच्या पुरातत्व (एएसआय) सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एएसआय सर्वेक्षण आदेशाविरुद्धची इंतेजामिया समितीची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, सर्वेक्षण आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्याबरोबरच या प्रकरणात दिवाणी खटला देखील चालवता येईल. १९९१ च्या पूजास्थळ कायद्यातील तरतुदींमुळे दिवाणी खटला प्रतिबंधित आहे, असा इंतेजामिया समितीचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला नाही.
सोमवारी न्यायालयात न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हा आदेश दिला. जामा मशीद इंतेजामिया समिती, हरि शंकर जैन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने १३ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. जामा मशिदीच्या इंतेजामिया समितीच्या पुनर्विचार याचिकेत संभलच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. दिवाणी न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षणासह वकील आयुक्तांमार्फत खटला कायम ठेवण्याचे निर्देशही दिले होते.
सर्वेक्षण आदेशाविरुद्ध मशीद समितीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की त्यांना कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात कोणतेही आक्षेप आढळले नाहीत. शाही जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि संभल न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
हरि शंकर जैन आणि इतर सात जणांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग संभळ यांच्या न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला, ज्यामध्ये म्हटले होते की संभलमधील जामा मशीद मंदिर पाडून बांधण्यात आली होती. तसेच १५२६ मध्ये संभल येथील हरिहर मंदिर पाडल्यानंतर मुघल सम्राट बाबरने ही मशीद बांधली होती. उच्च न्यायालयाने यापूर्वी मूळ दाव्यावरील दिवाणी न्यायालयात पुढील कार्यवाही पुढील तारखेपर्यंत स्थगित केली होती. आजच्या निर्णयाने हा अंतरिम आदेश देखील रद्द करण्यात आला.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’ वर वादग्रस्त टिप्पणी; अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खानला अटक
अमेरिकन डॉक्टरकडे आढळला भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन
मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याच्या कॉलमुळे उडाली खळबळ
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान गोंधळ झाला होता, ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता आणि २९ पोलिस जखमी झाले होते. या घटनेनंतर संभलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण हिंसाचाराची एसआयटी चौकशी करत आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे.
